वाहनचालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या काही वर्षांपासून कठोर पावले उचण्यास सुरुवात केली असून, २०१९ साली राज्यातील ५० विभागांत एकूण ३४ हजार वाहन परवाने निलंबित केल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली. २०१८ च्या तुलनेत या कारवाईत मोठी वाढ दिसून येत आहे. यात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या २२ हजार ४८० चालकांवर लायसन्स निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईचा आढावा घेतल्यास २०१८ मध्ये २८ हजार ५४७ वाहन परवाने निलंबित करण्यात आले होते. यामध्ये वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, लाल सिग्नल असतानाही तो ओलांडणे अशा प्रकरणांत सर्वाधिक कारवाई झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये या कारवाईत वाढ झाली असून, ३४ हजार २७३ वाहन परवाने निलंबित केल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली. मोबाइलवर बोलताना वाहन चालवल्याने केलेल्या कारवाईत १४ हजार ३५२ आणि २०१८ मध्ये ८ हजार १२८ चालकांचे वाहन परवाने निलंबित झाले आहेत.

वाहनचालकांकडून वाहतूक नियम सर्रासपणे मोडले जातात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करूनही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. एखाद्या चालकाने तीन वेळा गुन्हा केल्यास त्याचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जातो. अशाने चालकांच्या मनमानी कारभाराला चाप लागतो. मात्र त्यांना कायमचा लगाम लागावा यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात बदल करून दंडात मोठी वाढ केली आहे. त्याची अद्याप मात्र महाराष्ट्रात अंमलबजावणी झालेली नाही.