पहिल्या वातानुकूलित गाडीच्या ट्रान्स हार्बरवर १६ फेऱ्या

मुंबई : मध्य रेल्वेवर दाखल झालेली पहिली वातानुकूलित लोकल ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर धावणार असतानाच नवीन वर्षांत  दाखल होणाऱ्या आणखी पाच लोकलचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. यात सीएसएमटी ते कल्याण मार्गावर तीन वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन केले असून तिच्या २७ फेऱ्या होणार आहेत. त्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवर एकूण सहा वातानुकूलित लोकल येणार असून यातील पहिली लोकल जानेवारी महिन्यात ट्रान्स हार्बरवर धावेल. त्याच्या अप मार्गावर आठ आणि डाऊन मार्गावर आठ अशा १६ फेऱ्या दिवसभरात होतील. यात काही फेऱ्या गर्दीच्या वेळीही आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मार्च महिन्यापर्यंत आणखी एक लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात येईल. तर उर्वरित चार लोकल डिसेंबपर्यंत टप्प्याटप्प्यात येतील. ट्रान्स हार्बरवर वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक तयार असतानाच सीएसएमटी ते पनवेल हार्बर आणि सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गाचेही वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. हार्बरवरही एकच लोकल चालवताना त्याच्या अप मार्गावर सात आणि डाऊन मार्गावर ६ फेऱ्या होतील. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर तीन वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन केले असून त्यांच्या २७ फेऱ्या होतील, अशी माहिती देण्यात आली. यात डाऊन मार्गावर १५ आणि अप मार्गावर १२ फेऱ्या होणार असल्याचे सांगण्यात आले. एक वातानुकूलित लोकल ताफ्यात अतिरिक्त ठेवण्यात येणार आहे.