अनेकदा आपल्या जिवाची परवा न करता रेल्वेमध्ये, गाड्यांवर स्टंटबाजी सुरू असल्याचे पहायला मिळते. अशाप्रकारच्या स्टंटबाजीमध्ये अनेकांनी आपले जीव गमावल्याच्याही घटना घडल्या आहेत. मुंबईतही अशाचप्रकारच्या स्टंटबाजीचा प्रकार समोर आला आहे. 7 जून रोजी मुंबईतील कार्टर रोड परिसरात तीन तरूण गाडीच्या खिडक्यांबाहेर येऊन स्टंट करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गाडीही जप्त करण्यात आली आहे.

मुंबईतील कार्टर रोड परिसरात एका चालत्या गाडीत तीन तरूण स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची दखल घेत खार पोलिसांनी 8 जून रोजी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, सुलतान शेख, समीर सहिबोले आणि अनस शेख अशी अटक करण्यात आलेल्या तरूणांची नावे आहेत. हे सर्व तरूण कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे तरूण असून तिघेही मुंबईचेच रहिवासी आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्यावर कलम 279, 336 आणि वाहतूक कायद्याचे कलम 184 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

मे महिन्यातही मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरूणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होचा. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले होते. 9 मे रोजीही हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेनमध्येही काही मुलं स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा रेल्वे पोलिसांनी कारवाई केली होती.