बिहारमधील मातेचा शोध सुरू

मुंबई : वेश्याव्यवसायासाठी नवजात बालिकेची विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली असून टोळीच्या तावडीतून १५ ते २० दिवसांच्या बालिकेची सुटका केली आहे. बालिकेच्या आईनेच या टोळीला २५ हजार रुपयांना बालिकेचा व्यवहार ठरवल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.

आफरीन खान, शरिफा पठाण आणि मोहम्मद फजल पठाण अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षातील सहायक निरीक्षक शरद धराडे यांना कुरेशीनगर झोपडपट्टीत बालिकेची विक्री करण्यासाठी काही व्यक्ती एकत्र येणार, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून तिघांना बालिकेसह ताब्यात घेतले. ही बालिका मूळची बिहार राज्यातील आहे. पतीसोबत विलग झाल्यानंतर बालिकेची आई चार महिन्यांपूर्वी मुंबईत आली होती. या भेटीत आफरीन, शहिदा तिच्या संपर्कात आल्या होत्या. बिहारमध्ये मुलीला जन्म देताच तिने या दोघींशी संपर्क साधला. २५ हजार रुपयांना बालिकेचा व्यवहार ठरला होता. प्रसूतीपूर्वी आणि नंतर एकूण दहा हजार रुपये या टोळीने बालिकेच्या आईला दिले होते. उर्वरित १५ हजार रुपये बालिका ताब्यात घेतल्यानंतर देणार होतो, असे अटक केलेल्या आरोपींनी सांगितले. या बालिकेची विक्री दलालांकरवी कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला केली जाणार होती, अशी कबुली तिघांनी दिली.