लालबहादूर शास्त्री मार्गावर उभा केलेला बीयरच्या बाटल्यांचा ट्रक घेऊन पळ काढणाऱ्या तिघांना कुर्ला पोलिसांनी पकडले आहे. ट्रकमधील १५०० खोके तिघांनी नाशिकला विकण्याचा प्रयत्न केला होता. पण व्यवहार पूर्ण होण्याआधीच कुर्ला पोलिसांनी तिघांना अटक केली. विशेष म्हणजे आरोपींना याआधीही बीयर चोरी प्रकरणीच अटक करण्यात आली होती.

मानखुर्द येथे राहणारे ओमप्रकाश यादव यांनी औरंगाबाद येथून बीयरच्या बाटल्यांनी भरलेले १५०० खोके असलेला ट्रक भांडुप येथील गोदामात नेण्यासाठी आणला होता. मात्र, इतर ट्रकमधील बाटल्यांचे खोके उतरवले जात असल्याने त्यांना गोदामातील माणसांनी एक-दोन दिवस थांबण्यास सांगितले. त्यामुळे यादव यांनी ट्रक लालबहादूर शास्त्री मार्गावरील इंद्रानगर येथे १४ जुलैच्या रात्री उभा केला. दुसऱ्या दिवशी गोदामात ट्रक नेण्यासाठी ते इंद्रानगर येथे ते गेले असता, ट्रक त्याजागी नसल्याचे त्यांना आढळले. यादव यांनी तातडीने कुर्ला पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटय़े यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद राणे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान, हा ट्रक नाशिक येथील सिन्नर येथे असून तिथे खोके उतरविण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन हे खोके जप्त केले. पण ट्रक आणि त्याचे चोर पोलिसांना सापडले नाहीत. नवनाथ नावाच्या व्यक्तीने प्रत्येकी ८५० रुपयांनी १३०० खोके विकत घेतले होते. पोलिसांनी नवनाथशी संपर्क साधला असता, खोके विकणाऱ्यांना अजूनही पैसे दिलेले नसल्याचे त्याने सांगितले. पोलिसांच्या सांगण्यावरून नवनाथने खोके विकणाऱ्यांना मुंबईत टिळकनगर येथे पैसे घेण्यासाठी बोलावले. त्यानंतर टिळकनगर येथे लावलेल्या सापळ्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांच्या पथकाने लक्ष्मीकांत सिंग ऊर्फ बंटी (३२), आनंद नडुकर ऊर्फ चिंटय़ा (३१) आणि अमोल साळवी (३०) यांना पकडण्यात आले. १३०० खोके विकल्यानंतर ट्रक अहमदनगरमधील कोळपेवाडी येथे उभा करण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी ट्रक आणि उरलेले खोके असे मिळून चोरीला गेलेले १५०० खोके मिळवले.