सहार येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी तीन पर्यवेक्षकांना अटक करण्यात आली आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलाचा काही भाग बुधवारी रात्री अचानक कोसळला. हा उड्डाण पूल मरोळ ते सहार असा बांधण्यात येत असून एमआयएएलच्या वतीने त्याचे काम सुरू आहे. विमानतळासमोरील या पुलाचा ५० मीटरचा भाग कोसळला असून त्याखाली तीन मजुरांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. रामबली हास (४४), संतोष हास (२६) आणि प्रेमचंद मंडल (३०) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे असून धिरेंद्र महेश हास (२५), विनोदकुमार रमाशंकर यादव, मधु प्रसाद यादव (२३), सुरेश प्रसाद यादव (३२), सुनील बहादूर निसार (२२) आणि राजेंद्र प्रसाद यादव (२३) अशी जखमींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त अंबादास पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनी या पुलाचे बांधकाम करीत असून पेची मुट्टू सुब्रमणियम (२७), सुबाया वेलू श्रावनल (३४) आणि लखबीर निर्मल सिंग (२७) या कंपनीच्या पर्यवेक्षकांना अटक झाली आहे. पुलाच्या बांधकामामध्ये निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी या तिघांवर गुन्हा नोंदण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, हा अपघात झाला ते ठिकाण एमआयएएलच्या अखत्यारीत असून या टप्प्यातील बांधकामाशी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा संबंध नसल्याचा खुलासा प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी केला आहे. या पुलाच्या हयात रिजन्सी ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील हनुमान रोड जंक्शनपर्यंतच्या मार्गाचे बांधकाम प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहे, असे त्यांनी कळविले आहे.