ठाणे, कळवा, मुंब्रा आणि कल्याण या शहरातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एमडी क्रिस्टल पावडर (बुक) या नशेच्या आहारी ओढणाऱ्या टोळीविरोधात आता ठाणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी रात्री मुंब्रा परिसरात छापे टाकून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ७१ ग्रॅम वजनाची एमडी क्रिस्टल पावडर जप्त करण्यात आली आहे.
शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी ओढणारी एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र ‘बुक’ या सांकेतिक भाषेत ओळखल्या जाणाऱ्या  या पावडरचा अमली पदार्थामध्ये समावेश नसल्याने या टोळीविरोधात नेमकी कोणत्या कायद्याखाली कारवाई करायची, असा पेच पोलिसांपुढे उभा राहिला होता. दरम्यान, या टोळीचे जाळे दिवसेंदिवस पसरू लागले असून त्यामध्ये तरुणाई अडकत असल्याचे लक्षात येताच पोलीस विभागाने या टोळीविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आणि मुंब्रा बाह्य़वळण मार्गाजवळ सापळा रचून तिघांना अटक केली.