मुंबई : वांद्रे येथील चिंबई परिसरात गेल्या महिनाभरात तीन मांजरींचा अज्ञात व्यक्तीने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे, तर आणखी दोन मांजरी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वांद्रे पश्चिमेला चिंबई आणि पेरी रोड भागातील बेवारस मांजरींना डॉ. जोत्स्ना जंगराणी या अन्न देत. त्यासाठी त्यांनी शाम केवट या व्यक्तीला नेमले होते. तसेच या मांजरांचे त्यांनी नामकरण केले होते. गेल्या महिन्यात २४ तारखेला शाम यांना चिंबईनजीक दोन मांजरे जखमी अवस्थेत सापडली. त्यातील एका मांजराच्या जबड्याला मारहाण करण्यात आली होती, तर दुसऱ्या मांजराच्या जबड्याला आणि नाकाला मारहाण जखमा होत्या. केवट यांनी या मांजरांना रुग्णालयात दाखल केले.

खार येथील प्राण्यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच ९ एप्रिलला एका मांजराचा, तर १३ एप्रिलला दुसऱ्या मांजराचा मृत्यू झाला. के वट यांना १८ एप्रिलला आणखी दोन मांजरे जखमी अवस्थेत सापडली. या मांजरांनाही तोंडाला आणि नाकाला मारहाण केली होती. त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता एका मांजरीचा २२ एप्रिलला मृत्यू झाला, तर दुसऱ्या मांजरीवर उपचार सुरू आहेत. तसेच केवट यांना आणखी २२ एप्रिललाही आणखी एक मांजर तोंडाला आणि नाकाला केलेल्या मारहाणीमुळे जखमी झाल्याचे दिसले. या मांजरावरही रुग्णालयात उपचार सुरू आहे, असे केवट यांनी तक्रारीत म्हटले आहे.  याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी प्राण्यांची हत्या करणे आणि त्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याच्या  अधिनियमाखाळी गुन्हा दाखल केला आहे.