अपघातातील जखमींना दिलासा
रस्ते अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी कोणत्याही ठिकाणी अपघात झाला तर नजिकच्या रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णाचा त्याच्या नातेवाईकांचा शोध लागेपर्यंतचा पहिल्या तीन दिवसापर्यंतचा सर्व वैद्यकीय खर्च सरकार करणार असून त्याबाबतची योजना लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.
राज्यातील आरोग्य विभागाच्या दुरवस्थेबाबत अमरसिंह पंडित व अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान सावंत यांनी ही माहिती दिली. तामीळनाडूमध्ये अपघातामध्ये जखमी झालेल्या रूग्णाला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा खर्च सरकार करते. याच धर्तीवर राज्यातही अपघातग्रस्तांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार या योजनेमुळे लाखो अपघातग्रस्तांना दिलासा मिळेल असेही सावंत यांनी सांगितले.
योजनेत सुधारणा
राजीव गांधी जीवनदायी योजनेत महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून आता संर्पदंशावर उपचार, सांधे व गुडघा यांचे प्रत्यारोपण अशा काही नवीन आणि गरजेच्या उपचारांचा समावेश करण्यात आला असून ११३ कालबाह्य़ आजारांवरील उपचार या योजनेतून वगळण्यात आले
आहेत.
डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या नव्या स्वरूपातील योजनेत दुष्काळीभागातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांचा आणि अधिस्विकृतीधारक पत्रकारांचाही समावेश या योजनेत करण्यात आल्याचेही सावंत यांनी सांगितले.

* अपघातग्रस्ताना राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अतंर्गत शासनाने मान्यता दिलेल्या रूग्णालयात दाखल करण्यात आल्यास त्याचा तीन दिवसांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलेल.
* यादरम्यान अपघाग्रस्तांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जाईल.