पोलिसांनी बँक घोटाळ्याची तपासणी करताना एका खासगी कंपनीच्या तीन संचालकांना अटक केली आहे. भवरलाल भंडारी, प्रेमल गोरागांधी आणि कमलेश कानूनगो यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट आखल्याचा आरोपाखाली अटकेची कारवाई करण्यात आली. पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेड नावाच्या कंपनीवर देणगीदारांचे चार हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे, ज्यासंबंधी तपास सुरु आहे. कंपनीविरोधात अॅक्सिस बँकेने २५० कोटींच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

कंपनीचं पितळ उघडं पाडणा-या २० देणगीदारांपैकी एक अॅक्सिस बँक आहे. ज्यांना शुक्रवारी अटक करण्यात आलं आहे, त्यांच्याविरोधात बँकेच्या फोर्टमधील ब्रांचमध्ये इनवॉइस आणि बोगस कंपन्यांच्या माध्यमातून बनावट बिलं सादर करण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान पोलिसांनी या घोटाळ्यात बँकेच्या कर्मचा-यांचा हात असल्याची माहिती नाकारलेली नाही. अॅक्सिस बँकेच्या तक्रारीत अमिताभ पारेख, राजेंद्र गोठी, देवांशू देसाई, किरण पारेख आणि विक्रम मोरडानी यांचंही नाव आहे. अमिताभ पारेख यांचं २०१३ मध्ये निधन झालं आहे. तर दुसरीकडे, पारेख अॅल्यूमिनेक्सविरोधात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने केलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआय आधीच चौकशी करत आहे. कंपनी रिअल इस्टेट डेव्हलपर्सला फंड ट्रान्सफर करत असल्याचा आरोप आहे.

असा केला घोटाळा –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सर्वप्रथम अॅक्सिस बँकेकडून १२५ कोटींचे तीन शॉर्ट टर्म कर्ज घेतले आणि बँकांचा विश्वास संपादित करण्यासाठी ते परतही केले. २०११ मध्ये पारेखने अॅक्सिस बँकेकडून १२७.५ कोटींचं कर्ज घेतलं. यासाठी त्याने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सशी संबंधित अशा एका बैठकीची कागदपत्रं सादर केली, जी कधी झालीच नव्हती. बँकेने कंपनीला कच्चा माल आणि साहित्य खऱेदी करण्यासाठी कर्ज दिलं.

पारेखने कंपनीच्या खात्यावरील सर्व पैसे पर्सनल अकाऊंटवर ट्रान्सफर केले आणि कच्चा माल आणि साहित्य खरेदी करण्यासाठी बँकेत बनावट बिलं सादर केली. ज्या कंपनीकडून हे सर्व खरेदी करण्याचा दावा करण्यात आला ती फक्त कागदोपत्री होती. इतकंच नाही तर एका कंपनीला माल विकल्याचीही बनावट बिलं सादर करण्यात आली.

ट्रान्सपोर्ट बिलं तपासली असता गाड्यांचे क्रमांकही बनावट असल्याचं समोर आलं. दुचाकींचे नंबर चारचाकी वाहनांना लावण्यात आले होते. बँकेचा विश्वास जिंकण्यासाठी कर्जाची जी रक्कम पारेखच्या पर्सनल अकाऊंटवर पाठवण्यात आली होती, त्यानेच कर्ज फेडण्यात आलं.