मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

लष्कराकडून उभारण्यात आलेले परळ ते एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड आणि आंबिवली स्थानकातील पूल २७ फेब्रुवारीपासून प्रवाशांसाठी खुले होतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. तीनही पादचारी पूल मुंबईकरांना समर्पित केले जाणार असून त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत एल्फिन्स्टन रोड स्थानकात होणार आहे. याचबरोबर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या स्थानकासाठी लागणाऱ्या जमिनींच्या कागदपत्राच्या हस्तांतरणाचा कार्यक्रमही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणार असून वांद्रे-कुर्ला संकुलात तीन मजली भूमिगत स्थानक होणार आहे.

सप्टेंबर २०१७ मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकातील अरुंद पादचारी पुलावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत २२ प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला होता. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे मंत्रालयाने परळ ते एल्फिन्स्टन रोड स्थानकाला जोडणारा पूल, करी रोड आणि आंबिवली स्थानकातील पादचारी पुलांचे काम लष्कराच्या हाती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आश्चर्यही व्यक्त करण्यात आले. तीनही पूल जानेवारी २०१८ पर्यंत उभारण्याचे उद्द्ष्टि लष्कराने ठेवले. मात्र काही अडचणींमुळे त्यांची कामे पूर्ण होण्यास उशिर झाला. अखेर या पुलांची कामे पूर्ण करत ती प्रवाशांच्या सेवेत २७ फेब्रुवारीपासून आणण्याचा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामांना रेल्वे मंत्रालय, राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेड आणि राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे.

या प्रकल्पात वांद्रे-कुर्ला संकुल  येथे स्थानक होणार असून त्यासाठी लागणाऱ्या जमिनींचे कागदपत्र हस्तांतरीत करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत केला जाईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. राज्य सरकारकडून हे कागदपत्र रेल्वेला हस्तांतरित केले जातील. प्रकल्पात वांद्रे-कुर्ला संकुल येथे बुलेट ट्रेनचे भूमिगत तीन मजली स्थानक होणार आहे. त्यासाठी भूमिगत स्थानकासाठी ४.६ हेक्टर जागा लागेल. तर त्यावरील जागेत होणाऱ्या अन्य कामांसाठी ०.९ हेक्टर जागा लागणार असल्याचे सांगण्यात आले.

वांद्रे-कुर्ला संकुलात भूमिगत तीन मजली स्थानक होणार आहे. या स्थानकात..

  • पहिल्या मजल्यावर स्थानक परिसर आणि काही यंत्रसामग्री असेल. प्रवाशांना येथे प्रवेश नसेल
  • दुसऱ्या मजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स, फूड स्टॉल, तिकिट खिडक्या, प्रतिक्षालय
  • तीसऱ्या मजल्यावर स्थानक आणि सहा फलाट असतील.