मुंबई : जे.जे. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील प्राध्यापिका डॉ. राजश्री कटके यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केल्यानंतर आता आणखी तीन माजी विद्यार्थ्यांनी या आरोपाला पुष्टी जोडली आहे. आपणही हा छळ सहन केल्याची तक्रार त्यांनी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडे आणि रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे. चौकशी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

डॉ. कटके विद्यार्थ्यांच्या करिअर किंवा शिक्षणात खोडा घालण्याची भीती दाखवून त्यांच्या घरातील कामे करायला सांगतात, त्यांच्या मुलांच्या खरेदीच्या वेळेस सामान उचलण्यासाठी म्हणून जबरदस्तीने सोबत नेतात, बाहेरगावी जाण्याच्या परिषदेची तिकिटे काढायला लावतात आणि याचे पैसेही विद्यार्थ्यांना खिशातून घालायला लावतात, अशी लेखी तक्रार जे.जे. रुग्णालयातील पदव्युत्तर दुसऱ्या वर्गातील विद्यार्थिनीने गेल्या आठवडय़ात केली. याची दखल घेत मार्डने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर तीन माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव पत्राद्वारे रुग्णालय प्रशासनाला कळवले. रुग्ण आणि इतर कर्मचाऱ्यांशी घालूनपाडून बोलणे, महागडय़ा भेटवस्तूंची मागणी करणे, परिषदेच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या प्रवासाचे पैसे विद्यार्थ्यांना द्यायला लावणे आदी मानसिक छळ सहन केल्याची तक्रार या पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे आत्महत्या करण्याचे विचारही त्यावेळेस मनात येत असल्याचे एका विद्यार्थ्यांने सांगितले आहे. डॉ.कटके यांच्याविरोधात चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांनी केलेले आरोप चुकीचे असून कोणतीही वैयक्तिक कामे किंवा खर्च त्यांना आतापर्यंत करायला लावलेले नाहीत, असे डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले.लवकरच चौकशी समितीचा अहवाल समोर येईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.

आक्षेपार्ह शब्दांबद्दल ‘मार्ड’चा माफीनामा

डॉ. कटके यांच्या विरोधात तक्रार करताना मार्डने वापरलेल्या शब्दांमुळे समाजामध्ये आपली प्रतिमा मलीन झाल्याचा आक्षेप डॉ. कटके यांनी घेतला आहे. याप्रकरणी जे.जे.च्या मार्ड सदस्यांशी आणि मुख्य समितीशी चर्चा न करताच चौकशीचे पत्र जाहीर केल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर यांनी मान्य केले. त्यांनी अध्यक्ष या नात्याने या कृतीची जबाबदारी स्वीकारत आक्षेपार्ह शब्दांबद्दल लेखी माफी मागितली आहे.