कल्याण परिसरातील तीन वेगळ्या भागांत तीन स्त्री अर्भकांचा शनिवारी संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात ही तिन्ही भ्रूण शवविच्छेदनासाठी आणण्यात आली होती. स्त्रीभ्रूण हत्येचा हा प्रकार आहे का याचा शोध महिला सामाजिक कार्यकर्त्यांकडून घेण्यात येत आहे.
खासगी डॉक्टरांनी यामधील काही पालकांना पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यास सांगितले व मृत्युचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे या पालकांना पालिकेच्या रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला, असे सांगण्यात येते.  रुग्णालयात डॉक्टर, परिचारिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून समजले की, पिसवली गावातील एका दाम्पत्याने आपले १६ दिवसाचे मृत झालेले स्त्री अर्भक शवविच्छेदनासाठी आणले होते. मुदतीपूर्वीच बाळ जन्माला आल्याने या बाळाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. कल्याणमधील बेतुरकरपाडा- काळा तलाव भागातील एका दाम्पत्याने ११ दिवसांचे स्त्री अर्भक बाळ शवविच्छेदनासाठी आणले होते. या दाम्पत्याला यापूर्वी तीन मुली आहेत. तसेच कल्याणजवळील वरप गावातील एका दाम्पत्याने दोन महिन्यांचे स्त्री अर्भक शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात आणले होते. एक गरीब महिला आमच्या घरी हे बालक सोडून गेल्याचे आणि त्यानंतर या बाळाचा मृत्यू झाल्याचे या दाम्पत्याने पालिका डॉक्टरांना सांगितले. शवविच्छेदन अहवालात या बाळाच्या डोक्यावर मार लागल्याचे म्हटल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.