27 February 2021

News Flash

रेल्वेच्या बेजाबदार कारभारामुळे पनवेलमध्ये तीन मुलींचा खड्ड्यात बुडून मृत्यू

रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे तीन मुलींचा बळी गेल्याचा स्थानिकांचा आरोप

प्रतिकात्मक छायाचित्र

पनवेल रेल्वे स्टेशनच्या दोन अतिरिक्त फलाटांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मात्र रेल्वेच्या कामांचा वेग मंदावल्याचे दिसून येते आहे. इतकेच नाही तर रेल्वे स्थानकाबाहेर जे खड्डे खणण्यात आले आहेत त्यामध्ये पडून तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रेल्वेने केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच या घटनेमुळे संतापही व्यक्त होतो आहे.

पनवेल रेल्वे स्टेशनजवळ नव्या अतिरिक्त फलाटांचे काम दीड ते दोन वर्षांपासून सुरु झाले आहे. मात्र या कामांचा वेग मंदावला आहे. रेल्वेने जे खड्डे खणले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. तिथे कोणी जाऊ नये किंवा कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून कोणताही खबरदारीचा उपाय किंवा काळजी घेण्यात आलेली नाही. त्याचमुळे तीन मुलींचा जीव गेल्याची घटना घडली आहे. रेशम भोसले (वय १३), रोहिता भोसले (वय १०) आणि प्रतिक्षा भोसले (वय -८) अशी या मुलींची नावं आहेत. या मूळच्या अमरावतीच्या असून पनवेल रेल्वे स्टेशनजवळच्या भागात खेळत होत्या. या तिघीही कुटुंबीयांसह फुगे विक्रीचा व्यवसाय करत होत्या अशीही माहिती समजली आहे.

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेळताना या तिघीही रेल्वेने अतिरिक्त फलाटांसाठी खोदलेल्या खड्ड्यातल्या पाण्यात पडल्या आणि बुडाल्या. या मुलींना बुडताना पाहून स्थानिकांनी आणि काही तरूणांनी त्यांना बाहेर काढले. या तिघींपैकी एकीला पालिका रूग्णालयात आणि दोघींना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी जाहीर केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी आले. खड्ड्यांचे काम आमच्या अधिपत्याखाली येत नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र रेल्वेच्या कारभारामुळेच या तिघींचा बळी गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांच्याशी संपर्क साधला असता खड्ड्यांचा भाग पूर्णपणे झाकला होता, तरीही मुली खड्ड्यात कशा पडल्या हे लक्षात येत नसल्याची प्रतिक्रिया दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 8:13 pm

Web Title: three girls die in potholes near panvel station
Next Stories
1 मराठा बांधवांना SEBC प्रवर्गातून आरक्षण नको, ओबीसी फेडरेशनची भूमिका
2 गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा
3 ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ लोकसभा-विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
Just Now!
X