मुंबई : करोनामुळे होरपळत असलेल्या मुंबईला गुरुवारी आगीच्या घटनांनी चटके दिले. गुरुवारी एका दिवसात मुंबईत तीन ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या. या दुर्घटनांत जीवितहानी झाली नसली तरी एका घटनेत अग्निशमन दलाचे एक अधिकारी मात्र बेशुद्ध पडले.

अनधिकृत बांधकामांमुळे चर्चेत आलेल्या रघुवंशी मिलमध्ये सकाळी सव्वानऊ वाजता आग लागली. येथील ‘पी टू’ या पाच मजली इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. थर्मल इमेजिंग कॅमेरा वापरून आग नक्की कुठे लागली आहे, त्याचा जवानांनी शोध घेतला. आठ बंब, सहा जम्बो टँकर घटनास्थळी रवाना झाले होते. तब्बल सहा-साडेसहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.

नरिमन पॉइंट येथील जमनालाल बजाज मार्गावरील जॉली मेकर चेंबर येथे तळमजल्यावर असलेल्या एका बँकेच्या सव्‍‌र्हर रूममध्ये पहाटे सव्वापाच वाजता आग लागली. १४ मजल्यांच्या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या चार हजार चौ. फुटांच्या जागेत ही ‘बँक ऑफ बहारीन अ‍ॅण्ड कुवेत’ असून त्यात तळघरही आहे. संपूर्ण भागात आगीचा धूर पसरला होता. बँकेचा दरवाजा तोडून अग्निशमन दलाच्या जवानांनी आत प्रवेश करून आग विझवली. सकाळी आठ वाजता आग विझवण्यात जवानांना यश आले.

मरोळमधील औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री पाऊणच्या सुमारास आग लागली. तळमजल्यावर असलेल्या अडीच ते तीन हजार चौ. फुटांच्या जागेत साठवलेल्या डिझेल आणि इंधन तेलाच्या पिंपांना आग लागल्यामुळे काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग तीन ते चार गाळ्यांमध्ये पसरली. पाच फायर इंजिन आणि फोम टेण्डर, सात जम्बो टँकर यांच्या साहाय्याने पहाटे पावणेपाच वाजता ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.

बेशुद्ध अधिकाऱ्यास करोनाबाधा

मरोळ औद्योगिक वसाहतीत लागलेली आग विझवताना अग्निशमन अधिकारी बेशुद्ध झाले. आग विझवण्याचे काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली. सहकाऱ्यांनी त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. त्यांची करोना चाचणी केली असता ते बाधित असल्याचे आढळले. तसेच त्यांना न्युमोनिया झाल्याचेही आढळून आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली.