मुंबई : मोनो रेल्वेचे चीनच्या कंपन्यांचे कंत्राट रद्द केल्यानंतर आता तीन भारतीय कंपन्यांनी ‘मोनो’च्या डब्यांचे संकल्पचित्र, उत्पादन, पुरवठा आणि चाचणीच्या कामात रस दाखवला आहे. काही दिवसांपूर्वी मोनो रेल्वेचे चायनीज कंपन्यांचे या कामासाठीचे ५०० कोटींचे कंत्राट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रद्द केले होते. त्यानंतर भारतीय कंपन्यांशी चर्चा सुरू होती.

गलवान खोऱ्यातील चीनच्या सैन्याबरोबर झालेल्या घटनेनंतर चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द केली जाऊ लागली होती. रेल्वे आणि दूरसंचार विभागापाठोपाठ एमएमआरडीएने देखील मोनोचे कंत्राट रद्द केले होते. ‘बिल्ड युअर ड्रिम’ आणि ‘चायनीज रेल रोड कॉर्पोरेशन’ या दोन कंपन्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरल्या होत्या. मात्र त्यानंतर अटी-शर्ती बदलण्याबाबत या कंपन्यांकडून दबाव आणला जात असल्याने पंधरा दिवसांपूर्वी या दोन्ही कंपन्यांचे कंत्राट रद्द केले होते.

‘एमएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पांसाठी मेक इन इंडियाअंतर्गत सध्या ज्या कंपन्या मेट्रोचे डबे तयार करण्याचे काम करत आहेत त्यांनीच या कामी रस दाखवला आहे. मेट्रोच्या तीन मार्गिकांसाठी सध्या ‘भारत अर्थ मूव्हर्स’ (बीईएमएल) ५०४ डब्यांची निर्मिती करत आहे. त्यांच्याबरोबरच भेल, तितागड वॅगन्स यांनीदेखील मोनोच्या डबेनिर्मितीच्या कामात रस दाखवल्याची माहिती मिळते. तितागड वॅगन्सची तयारी अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये १० रेकची बांधणी करण्यात येणार आहे.

यापूर्वी मोनोचे संचालन स्कोमी ही मलेशियन कंपनी करत असे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘एमएमआरडीए’ने स्कोमी दिवाळखोरीत निघाल्यावर घरचा रस्ता दाखवत संचालन आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र स्कोमीने सुटय़ा भागांचा योग्य साठा केलेला नव्हता.

मोनोसाठी अन्य कोणत्याही कंपनीचे रेखांकन मोनो रेल्वेला योग्य ठरणारे नाही. त्यामुळे नव्याने रेखांकन, उत्पादन, पुरवठा आणि चाचण्या कराव्या लागणार आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने अधिक खर्च सोसायची तयारीदेखील दर्शविली, त्यानुसार ५०० कोटींची निविदा जानेवारीतच काढण्यात आली होती.

मोनो रेल्वेचा पहिला टप्पा (वडाळा ते चेंबूर) २०१४ मध्ये कार्यरत झाला, २०१९ मध्ये दुसरा टप्पा (चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक) असा विस्तार झाला. मात्र सातत्याने जाणवणारी सुटय़ा भागांची कमतरता, नवीन रेक उपलब्ध नसणे यामुळे एकूणच मोनोला प्रतिसाद अत्यल्प होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी उत्पन्न वाढविण्यासाठी वाढदिवस, प्री-वेडिंग छायाचित्रण यासाठी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.