भंगार दुकानासमोर कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटलीचा स्फोट होऊन तीन मुले जखमी झाल्याची घटना मानपाडय़ातील कृष्णानगरमध्ये शनिवारी संध्याकाळी घडली.
सुरज गुप्ता (१३), सुजल गुप्ता (७) आणि सौरभ गुप्ता (६) अशी या जखमींची नावे आहेत. ते संतोष नगर येथील राहणारे आहेत. अपघाताची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अब्दुल रेहमान यांच्या मालकीचे हे भंगार दुकान आहे. दुकानासमोर काही ही मुले खेळत होती. त्यांच्या हाती हवा बंद असलेली किटक नाशकांची बाटली लागली. मोठय़ा हवेच्या दाबाने भरलेली ही बाटली फोडण्याचासाठी ही मुले प्रयत्न करीत असताना या बाटलीचा प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात ही तीनही मुले जबर जखमी झाली. यापैकी सुरज १० टक्के, सुजल १५ टक्के तर सौरभ २० टक्के भाजले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या पथकाने या तीनही मुलांना मानपाडय़ातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.  या प्रकरणी कापुरबावडी पोलीसात नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे पालिकेने दिली आहे.