पश्चिम बंगालमधून बनावट नोटा आणून त्या मुंबईत वितरित करण्याच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने पायधुनी येथून एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
झारखंड येथील एक इसम बनावट नोट वितरित करण्यासाठी पायधुनी येथे येणार असल्याची माहिती मालमत्ता शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा लावून या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून साडेतीन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पश्चिम बंगालमधून नोटा आणून तो मुंबई आणि इतर राज्यांत वितरित करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.