राज्यात प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली असून नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक बंदीमुळे उद्योगाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असला असून, अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. एकीकडे या निर्णयाचं स्वागत केलं जात असताना प्लास्टिक उत्पादन कंपन्या मात्र हा एकतर्फी निर्णय असल्याची टीका करत आहेत. प्लास्टिक बंदीमुळे जवळपास १५ हजार कोटींचं नुकसान तसंच ३ लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे.

प्लास्टिक बंदीवर बोलताना प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस निमित पुनामिया यांनी सांगितलं आहे की, ‘राज्य सरकारने जाहीर केलेल्या बंदीमुळे उद्योगाला खूप मोठा फटका बसला आहे. प्लास्टिक उद्योगाला १५ हजार कोटींचं नुकसान झालं असून एका रात्रीत तीन लाख लोकांनी आपली नोकरी गमावली आहे’.

निमित पुनामिया यांनी दिलेल्या माहितीननुसार, अडीच हजार फॅक्टरी मालकांना आपल्या दुकानांना टाळं ठोकावं लागलं आहे. बंदीचा हा निर्णय दुजाभाव करणारा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. दुसऱ्यांदा उल्लंघने केल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्याला २५ हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांची कैद होणार आहे.