गेल्या चार दिवसांत मद्य प्राशन करून वाहन दामटविणाऱ्या १२१ तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यात त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे समजते. शहरात नाताळच्या आगमनापासून ते नववर्ष उजाडेपर्यंत नशेत तर्र्र होऊन गाडी चालवण्याची पद्धत रुजत असल्याने या पद्धतीला आळा बसावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून एकूण ९० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यात ही कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरवर्षी नववर्षांपूर्वी रेस्टॉरंट, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये मोठय़ा प्रमाणात ‘पार्टी’चे आयोजन करण्यात येते. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण अधिक वाढत आहे. यात १८ ते ३२ वर्षांतील तरुण तारुण्याच्या जोशात सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. हेल्मेट न घालणे, दारू पिऊन गाडी चालवणे, मित्रांसोबत शर्यत लावणे, यात गाडी बेदरकारपणे चालवणे यासाठी सातत्याने कारवाई होऊनही प्रत्येक वर्षी नाताळ काळात नशा करून गाडी चालवण्याची रीत सुरूच आहे. यावर उपाय म्हणून वाहतूक खात्यातर्फे महाविद्यालयांमध्ये जागृती शिबिरे घेतली जात आहेत. याचा परिणाम काही काळात दिसू लागेल, अशी आशा वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.