गेल्या तीन वर्षांत एकही कुष्ठरोगाचा रुग्ण न आढळलेल्या मुलुंड विभागात तीन रुग्ण आढळले आहेत. कुष्ठरोग विभागाने या भागामध्ये घेतलेल्या शोध मोहिमेतून या रुग्णांचे निदान केले असून यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.

मुंबईतील या विभागात गेल्या तीन वर्षांत एकही कुष्ठरुग्ण आढळलेला नाही. त्याआधी एक किंवा दोन रुग्ण या विभागात नोंदले जात. मात्र एकाही रुग्णाचे निदान होत नाही, याचा अर्थ हा आजाराचे समूळ उच्चाटन झाले असे नव्हे. नागरिकांमध्ये या आजाराबाबत असलेले अपुरे ज्ञान आणि भीती यांमुळे रुग्णांचे निदान होत नाही. नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबईच्या कुष्ठरोग विभागाने गेल्या महिन्यामध्ये मुलुंड कॉलनी आणि सुंदरनगर या भागातील ३० ते ३५ हजार घराचे सर्वेक्षण केले. यातून तीन बहुजिवाणू म्हणजेच मल्टीपॉसिबॅसिलरी प्रकाराचे रुग्ण आढळले आहेत. मुलुंड कॉलनीमध्ये दोन आणि सुंदरनगर विभागात एका रुग्णाचे निदान केले असून यांच्यावर उपचारही सुरू केले आहेत.

३० ते ३५ हजार घरांच्या सर्वेक्षणानंतर तीन रुग्ण आढळणे ही बाब क्षुल्लक वाटत असली तरी २०२० हे कुष्ठरोग समूळ उच्चाटनाचे लक्ष्य सरकारने नेमून दिले आहे. हे रुग्ण संख्येने कमी असले तरी यांच्यापासून कुष्ठरोग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्या वाढण्याचा संभव आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाचे वेळेत निदान होणे अत्यावश्यक असल्याचे मुंबई जिल्हा कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. राजू जोटकर यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यामध्ये कुष्ठरोग निदान मोहीम

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कुष्ठरोग निदान मोहिमेमध्ये मुंबईत ५२ रुग्ण आढळले असून या रुग्णांच्या जवळपासच्या लोकांमध्ये हा आजार पसरू नये म्हणून जवळपास नऊ हजार नागरिकांना औषध देण्यात आले आहे. त्यामुळे हा आजार पसरण्याचा धोका टळण्याची शक्यता आहे. या वर्षीदेखील सप्टेंबर महिन्यामध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. यासाठीचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त झाला आहे. यातून निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल, असे ही पुढे डॉ. जोटकर यांनी स्पष्ट केले.

कुष्ठरोगाच्या माहितीसाठी हेल्पलाइन

कुष्ठरोगाचा डाग हा न खाजणारा आणि न दुखणारा असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. या आजाराबाबतची समाजातील अढी इतक्या वर्षांनंतरही कायम असल्याने शंका असूनही याबाबत उपचार घेण्यासाठी रुग्ण पुढे येत नाहीत. आरोग्य सेवक घरी गेले तरी घरामध्ये किंवा आजूबाजूच्यांना याबाबत समजेल या भीतीनेही लोक बोलत नाहीत. तेव्हा अशा संशयित रुग्णांच्या मनातील शंकांचे निरसन करून वेळेत निदान करण्यासाठी पालिकेच्या मदतीने मोफत हेल्पलाइनही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.