मध्य रेल्वे सुरक्षा दलाची धावत्या ट्रेनमध्ये कारवाई

मुंबई: मोबाइल चोरी करून मंगलाद्वीप एक्स्प्रेसने पळूून जाणाऱ्या तीन चोरांना रेल्वे सुरक्षा दलाने शिताफीने पकडले. त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे २८ भ्रमणध्वनी हस्तगत करण्यात आले. पनवेल व केरळ रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई केली.

केरळमधील एक भ्रमणध्वनी विक्रीचे दुकान फोडून २८ भ्रमणध्वनी चोरून तीन जण मंगलाद्वीप ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसने जात होते. ही गाडी पनवेल, भुसावळ मार्गे जाते. तीन आरोपींची छायाचित्रे व अन्य माहिती के रळ पोलिसांकडून सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आली होती. त्यानुसार पनवेल रेल्वे सुरक्षा दलाने पनवेल ते भुसावळ स्थानकांदरम्यान सर्व डब्यांची बारकाईने तपासणी करण्यास सुरुवात के ली. यात कसारा स्थानकाआधी एक आरोपी पोलिसांना दिसला. सचिन हुडा असे नाव असल्याचे त्याने सांगितले. त्याची चौकशी करत असतानाच याच गाडीतील आणखी एक आरोपी आटगाव स्थानकाजवळ एक्स्प्रेस धीमी होताच उतरून पळून गेला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी त्वरित पथक रवाना करण्यात आले, तर आणखी एका सहकाऱ्याची माहितीही आरोपीने दिली. सर्व आरोपींना चार ते पाच तासांतच अटक करण्यात आली.