मुंबई : लालबागच्या ‘साराभाई’ इमारतीमधील गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटनेत होरपळलेल्या तिघांचा शुक्रवारी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या पाच झाली आहे. तसेच मसिना रुग्णालयात दाखल असलेल्या चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लालबागमधील गणेशगल्लीतील ‘साराभाई’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात गेल्या रविवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १६ जण गंभीररीत्या भाजले होते. यापैकी करीम (५०) आणि सुशीला बागरे (६२) या दोघांचा मृत्यू झाला, तर उर्वरित गंभीर जखमींना केईएम आणि मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इमारतीतील रहिवाशी मंगेश राणे (६१) यांचा अन्नपदार्थ पुरविण्याचा व्यवसाय होता. त्यासाठी लागणारे साहित्य ‘साराभाई’मधील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत ठेवण्यात आले होते. या खोलीतील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गंभीर भाजलेले मंगेश राणे यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर उपचारादरम्यान ज्ञानदेव सावंत (८५) आणि ममता मुंगे (४८) यांचाही शुक्रवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या पाच झाली आहे. तर मसिना रुग्णालयात दाखल असलेले चार जखमींची प्रकृती गंभीर आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तिघांना शुक्रवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 12:23 am