मीरा-भाईंदर ते ठाणे, वडाळा-जीपीओ, कल्याण ते तळोजा प्रवास सुलभ होणार

मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर अशा संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणणाऱ्या राज्य सरकारने मंगळवारी मेट्रोच्या तीन नवीन मार्गाना मंजुरी दिली. सध्या उभारण्यात येत असलेल्या मेट्रो मार्गाना जोडून हे नवीन मार्ग आखण्यात येणार आहेत. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड), कल्याण ते तळोजा (नवी मुंबई) या दोन मार्गासह वडाळा ते मुख्य टपाल कार्यालय (जीपीओ) या मार्गालाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाणे, मीरा-भाईंदर, तळोजा या शहरांत प्रवास करणे सुलभ होणार आहे. त्याच वेळी वडाळा ते कासारवडवली (ठाणे) या मेट्रो मार्गालाच जोडण्यात येणाऱ्या नवीन मार्गामुळे ठाणेकरांना थेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे.

मेट्रो १०, ११ आणि १२ असे या नवीन मार्गाना ओळखले जाणार असून या माध्यमातून मुंबईत ४१ किमीचे मेट्रो जाळे नव्याने विणण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मंजूर झालेले तीनही नवीन मेट्रो मार्ग सध्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो मार्गाशी जोडले जातील. गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मार्ग सध्या काम सुरू असलेल्या कासारवडवली ते वडाळा या मेट्रो मार्गाला जोडला जाईल. तर वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्रस्तावित मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कासारवडवलीपर्यंतचा प्रवास शक्य होईल. वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. या मार्गिकेचा फायदा मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पुनर्विकसित होणाऱ्या क्षेत्राला होणार आहे.

कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात एमएमआरडीए व राज्य सरकार यांच्यासह सिडको आणि एमआयडीसी यांचाही सहभाग असणार आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे. ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रस्तावित मेट्रो ५ चा मार्ग, नवी मुंबई मेट्रो मार्ग आणि कल्याण ते तळोजा मेट्रो १२ यांचे एकात्मीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.

मेट्रो १०- गायमुख ते शिवाजी चौक

एकूण लांबी – ९.२०९ किमी. (९.५२९ किमी उन्नत, ०.६८ किमी भुयारी मार्ग).

अंदाजित खर्च – ४ हजार ४७६ कोटी रुपये.

स्थानके – गायमुख, गायमुख रेतीबंदर, वसरेवा चार फाटा, काशिमीरा, शिवाजी चौक

प्रकल्प पूर्ती – मार्च २०२२.

मेट्रो ११- वडाळा ते जीपीओ (सीएसएमटी)

एकूण लांबी – १२.७७४ किमी (वडाळा ते शिवडी ४ किमीचा उन्नत मार्ग, शिवडी ते सीएसएमटी ८.७६५ किमी भुयारी मार्ग).

अंदाजित खर्च – ८ हजार ७३९ कोटी.

स्थानके –  वडाळा आरटीओ, गणेशनगर, बीपीटी हॉस्पिटल (उन्नत), शिवडी मेट्रो, हे बंदर, कोल बंदर, दारूखाना, वाडी बंदर, क्लॉक टॉवर, कॉरनक बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सर्व भुयारी स्थानके).

प्रकल्प पूर्ती – मार्च २०२६.

भुयारी कामाचा खर्च कोण करणार?

वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानचा मेट्रो मार्ग पोर्ट ट्रस्टच्या जागेतून जातो. उन्नत मार्गिकेमुळे पोर्ट ट्रस्टच्या विकासकामांना अडथळा होतो म्हणून त्याऐवजी भुयारी मार्गिका करावी, अशी भूमिका मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतली होती. त्यावर भूमिगत मेट्रो अधिक खर्चीक असल्याने या खर्चाचा भार काही प्रमाणात पोर्ट ट्रस्टने उचलावा असे एमएमआरडीएने पोर्ट ट्रस्टला सांगितले होते. आता ही मेट्रो काही प्रमाणात भुयारीकरणाचा निर्णय झाला असला तरी खर्चाचा भार कोण उचलणार हे गुलदस्त्यात आहे.

मेट्रो १२ साठी विकासकांचा दबाव?

कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गावर गेल्या काही वर्षांत अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले आहेत. या परिसराला इतर परिसराशी सोयीस्कर जोडणी नसल्यामुळे हा मेट्रो मार्ग व्हावा यासाठी सत्ताधारी पक्षाशी जवळीक असणाऱ्या काही विकासकांनी दबाव आणला होता. त्यातूनच हा मार्ग मार्गी लागल्याचे बोलले जात आहे.

वेळेत बचत, कोंडीत घट

या नवीन मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत ५० ते ७५ टक्के बचत आणि २५ ते ३० टक्के वाहनचालक मेट्रोकडे वळतील अशी अपेक्षा प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. मेट्रो मार्गिकांच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होऊन प्रत्येक चौरस मीटर जागेचा लाभ १२ ऐवजी सात प्रवाशांना होईल, अशी अपेक्षा प्राधिकरणाकडून व्यक्त केली जात आहे.

मेट्रो १२- कल्याण ते तळोजा

* एकूण लांबी – २०.७५ किमी (संपूर्ण उन्नत).

* अंदाजित खर्च – ५ हजार ८६५ कोटी.

* स्थानके –  एपीएमसी कल्याण, गणेशनगर, पिसवली गाव, गोलवली, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुतणे, कोळेगाव, निळजे गाव, वाडवली, बाले, वकलण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे, तळोजा.

* प्रकल्प पूर्ती – मार्च २०२४.