मुंबईतील करोनाबाधितांची संख्या वाढतच असून गुरुवारी आणखी १३६५ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ७० हजाराच्या पुढे गेला आहे, तर आणखी ९८ मृत्यूंची संख्या समाविष्ट केल्यामुळे मुंबईतील मृतांची संख्याही चार हजाराच्या पुढे गेली आहे. तर मृत्यूचे प्रमाण ५.७ वर गेला आहे.

गुरुवारी तीन करोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला. तर बाधितांपैकी १९०० अधिकारी, अंमलदार करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले. त्यापैकी एक हजार पोलीस कर्तव्यावर परतले असून सध्या ६५० पोलीस उपचार घेत आहेत. पांडुरंग पवार(५२), ब्रम्हदेव शेंडगे(५४)आणि संजय मोरे(५३) अशी मृत्यू झालेल्या पोलिसांची नावे आहेत. पवार मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक म्हणून नेमणूकीस होते. हवालदार शेंडगे दादर पोलीस ठाण्यात तर हवालदार मोरे समता नगर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत होते. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने ‘चाळिशी’ ओलांडली असून मुंबईतील रुग्ण दुपटीचा काळ बुधवारी ४१ दिवसांवर पोहोचल्याचा दावा पालिकेने केला आहे. हाच कालावधी १६ जून रोजी ३० दिवस होता. तर रुग्णवाढीच्या टक्केवारीतही घट झाली असून आता मुंबईमधील रुग्णवाढीचा सरासरी दर १.७२ टक्के असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.