आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन नव्या मेट्रो मार्गिकांना मंजुरी दिली आहे. यामध्ये गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड), वडाळा-सीएसएमटी आणि कल्याण-तळोजा या मार्गांचा समावेश आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे विस्तारत आहेत. त्यातच आता मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांनाही गती देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी मेट्रोच्या संचालनासाठी मुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, नव्या मेट्रो मार्गिकांध्ये गायमुख ते शिवाजी चौक ही मेट्रो 10 मार्गिका 11.4 किलोमीटरची असणार आहे. यासाठी 4 हजार 476 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही मेट्रो 11 मार्गिका 14 किलोमीटरची असेल. तर यासाठी 8 हजार 739 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, कल्याण-तळोजा ही मेट्रो 12 मार्गिका 25 किलोमीटरची असून यासाठी 4 हजार 132 कोटी रूपयांचा खर्च येणआर आहे.

दरम्यान, डोंबिवलीमार्गे कल्याण मेट्रोचा विस्तार तळोजापर्यंत करणार असल्याची घोषणा यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालासही मंजुरी देण्यात आली होती. तसेच या मार्गावर 17 स्थानकांचा समावेश असेल.