सामान्य लोकलचे तीन किंवा सहा डबे वातानुकूलित करण्याचा पर्याय

पश्चिम रेल्वे मार्गावर संपूर्ण वातानुकूलित लोकल गाडीमुळे प्रवाशांचा होणारा खोळंबा लक्षात घेऊन सामान्य लोकल गाडीचे तीन किंवा सहा डबे वातानुकूलित करण्याबाबतचा अभ्यास करण्यात आला असून त्यासंबंधीचा अहवाल आता रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. बारा डबा लोकलचे सहा डबे वातानुकूलित करण्यापेक्षा प्रायोगिक तत्त्वावर तीन डबेच वातानुकूलित करण्याबाबतही विचार सुरू आहे. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात येईल.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते चर्चगेट अशी वातानुकूलित लोकल गाडी २५  डिसेंबर २०१७ रोजी धावली. त्यानंतर या गाडीचा विस्तार विरापर्यंत करण्यात आला. मात्र वातानुकूलित लोकल गाडी चालविताना सामान्य लोकलच्या बारा लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने अन्य लोकल फेऱ्यांवर प्रवाशांचा भार वाढला.

रेल्वेच्या या निर्णयाला प्रवाशांनी विरोधही केला. त्यामुळे किमान प्रथम श्रेणीच्या प्रवाशांना वातानुकूलित लोकल गाडीतून प्रवास करण्याची मागणीही करण्यात आली. गेल्या महिन्याभरात या गाडीला प्रतिसाद वाढला असून तीन लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.

वातानुकूलित लोकलचे तिकिट सामान्य प्रवाशाच्या अवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे हा प्रवास सामान्य प्रवाशांना परवडेल का अशी शंका असणाऱ्या रेल्वेने वातानुकूलित प्रवास देण्यासाठी काही पर्यायही समोर ठेवले आहेत. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर बारा डब्यांच्या लोकल गाडय़ा धावत असून यातील सहा किंवा तीन डबे वातानुकूलित करता येतील का याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून एक समितीही नियुक्त करण्यात आली. या समितीकडून याचा अभ्यास आणि माहिती गोळा करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

* या समितीत पश्चिम आणि मध्य रेल्वे, रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे अधिकारी, रिसर्च डिजाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी आहेत.