मुंबईतील उपनगरी रेल्वेतील धक्कादायक प्रकार

मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवासात ज्वलनशील रसायनाचा स्फोट होऊन तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. माहीम ते किंग्ज सर्कल दरम्यान हा प्रकार घडला. यात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मोहम्मद फारुकी याचाही समावेश आहे.

अंधेरी स्थानकातून शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पनवेलसाठी उपनगरी रेल्वे सुटली. मोहम्मद फारुकी (वय १९) माहीम स्थानकातून रेल्वे मालडब्यात चढला. त्याच्याजवळील एका प्लास्टिक पिशवीत ज्वलनशील असलेले एक रसायन होते.

रसायन असलेली पिशवी  रेल्वेच्या दरवाजाला आदळली. त्याचवेळी या पिशवीतून गॅस बाहेर येऊ लागला. डब्यातील अन्य प्रवाशांनी मोहम्मदला पिशवी फेकून देण्यास सांगितले. मात्र मोहम्मदने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सव्वा नऊच्या सुमारास माहीम ते किंग्ज सर्कल दरम्यान उपनगरी रेल्वे आली असता या रसायनाचा छोटा स्फोट झाला.

स्फोटामुळे रसायन प्रवाशांच्या अंगावर उडाले. त्यात मोहम्मदसह शिवसागर पाठक (४८) आणि शिवा द्विवेदी (३८) हे दोघेही जखमी झाले. प्रवाशांनी आपतकालिन साखळी खेचली आणि तत्काळ याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला दिली.

किंग्ज सर्कल स्थानकात रेल्वे आल्यानंतर या तिघांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील शिसागर पाठक यांचा चेहरा आणि डोळ्याचा काही भाग भाजला आहे.

द्विवेदी किरकोळ जखमी झाले आहेत. यातील रसायन घेऊन जात असलेला फारुकी गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के.के. अशरफ यांनी दिली.

रेल्वे प्रवासात ज्वलनशील पदार्थ घेऊन जाताना आढळल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड वसूल केला जातो. या घटनेनंतर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाकडून विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना केल्या आहेत.