१२ जूनच्या पहाटे दादरच्या टिळक भवनाशेजारील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नंदकिशोर वाघेला ऊर्फ नंदू या तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला. हत्या घडली तेथून जवळच असलेल्या प्रियदर्शनी इमारतीत राहणारा नंदू मजूर होता. मिळेल ते काम करायचा. मृतदेहाची अवस्था पाहून एकापेक्षा जास्त हल्लेखोरांनी आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व नंतर अवजड, धारदार शस्त्रांचे असंख्य वार करून हत्या केली असावी, असा दादर पोलिसांचा वहिम होता.

तीन महिने उलटूनही नंदूच्या हत्येचे गूढ उकलत नव्हते. हल्लेखोरांची ओळख पटवणारा, त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा एकही ठोस पुरावा वा दुवा हाती न आल्याने पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली. तोवर केवळ अंदाजांवर पोलीस तपास करीत होते; मात्र याच गुन्ह्य़ाचा समांतर तपास करणाऱ्या खार पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधत आरोपींची ओळख पटवली आणि नंदूच्या हत्येचे गूढ उकलले.

टिळक भवनाशेजारील मोडकळीस आलेल्या इमारतीचे आवार मद्यपींचा अड्डा बनला होता. या मद्यपी मंडळांतील काहींनी नंदूची हत्या केली. होती. सत्यम हौसलाप्रसाद सिंग, त्याचा भाऊ शिवम आणि मित्र मयंक शुक्ला यांनी नंदूची अत्यंत निर्घृणरीत्या हत्या केली. त्यांच्यातील शिवम हा इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशन विषयात ‘बीई’, तर मयंक इव्हेन्ट मॅनेजमेन्ट शिकत आहे. सत्यम एका कुरिअर कंपनीत नोकरीस आहे. मयंक दादरच्या गोखले रोडवर राहातो. सत्यम-शिवमही दादरचेच; पण काही महिन्यांपासून ते नालासोपारा येथे स्थायिक झाले होते. दादरमध्ये एका शिवसैनिकाला मारहाण केल्यानंतर हौसलाप्रसाद सिंह याच्या कुटुंबाने दादर सोडले. सत्यम आणि शिवम हे नित्यनेमाने दादरमधील अड्डय़ावर येत होते.

१२ जूनला ते दोघे, मयंक आणि अन्य मित्र परिवार या अड्डय़ावर दारू पीत होते. मद्यपानात मध्यरात्र उलटली. त्यानंतर नंदू झोपेतून उठला. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे लोअर परळच्या दीपक सिनेमाजवळ नाश्ता करण्यासाठी घराबाहेर पडला. नंदू रोज ठरलेल्या वेळेला, ठरलेल्या फेरीवाल्याकडे नाश्ता करे. तिथे जात असताना अड्डय़ावर बाहेरची मंडळी बसल्याचे त्याने पाहिले. तुम्ही इथे काय करताय, ही आमची जागा आहे, अशा शब्दांत नंदूने त्यांना दरडावले. त्यावरून वाद सुरू झाला. मद्याच्या अमलाखाली असलेल्या आरोपींनी नंदूला पकडले आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. नंदूने त्यांचा प्रतिकार केला. याच वेळी नंदूने मयंकला दगड फेकून मारला. त्यामुळे आरोपी आणखी चवताळले आणि त्यांनी धारदार शस्त्राने नंदूवर वार केले.

ही घटना एका सुरक्षारक्षकाने पाहिली, परंतु त्याविषयी त्याला नीटसा अंदाज आला नाही. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत हा प्रसंग टिपला गेला होता. नंदूने मारलेला दगड, त्यानंतर राग अनावर झालेल्या आरोपींनी नंदूला केलेली मारहाण त्यात दिसत होती, परंतु त्यात कोणाचाही चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे पोलिसांना नंदूची ओळख पटवल्यावर त्याच्या घरातूनच तपासाला सुरुवात केली.

महिन्याभरानंतरही नंदूच्या हत्येचा तपास पुढे जाईल असे ठोस पुरावे, माहिती, दुवे पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे भलत्याचाच बळी (‘मिस्टेकन आयडेन्टिटी) असा हा प्रकार आहे का, याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला. नंदू व त्याच्या कुटुंबाला झोपु योजनेत सदनिका मिळाली होती. त्यावरून घरच्यांनीच नंदूचा काटा काढला नाही ना, या अंदाजावरही पोलिसांनी बरेच दिवस तपास चालवला. अड्डय़ावर नियमित सदस्य असलेल्यांची कसून चौकशी केली गेली, पण तपास काही केल्या पुढे सरकत नव्हता.

अशात पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर गुन्ह्य़ाची उकल करण्यासाठी शहरातील सर्वच पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेला सूचित केले. त्यानुसार खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कदम, साहाय्यक निरीक्षक पांडुरंग लोणकर, उपनिरीक्षक राजकुमार पोवार, साहाय्यक फौजदार शेख, हवालदार पेडणेकर, नांगरे, शिरसाट, जाधव, विश्वजीत सावंत, गणेश सावंत, खारगी या पथकाने तपासावर लक्ष केंद्रित केले. आधीच्या सर्व शक्यता पडताळल्यानंतर हल्लेखोर परिसराबाहेरचे असावेत, हे स्पष्ट झाले.

निरीक्षक कदम आणि पथकाने त्यानुसार अड्डय़ावर नियमित असलेल्यांची पुन्हा चौकशी केली गेली. त्यात मयंक शुक्ला बाहेरच्या मित्रांना इथे आणतो, ही माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार मयंकच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने नंदूच्या हत्येची कबुली दिली आणि सहआरोपींचा सहभाग, ठावठिकाण्याबाबत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला.

या गुन्ह्य़ात  तांत्रिक तपास आणि मोबाइल लोकेशन, कॉल डाटा रेकॉर्डपेक्षाही बारीकसारीक गोष्टींचा खोलात जाऊन पारंपरिक पद्धतीने तपास करून नेमकी माहिती काढण्याची सचोटी खार पोलीस ठाण्याच्या पथकाला उपयोगी पडली.