शैलजा तिवले

ताणयुक्त जीवनशैलीशी संबंधित व्याधींचा टक्का चढाच; रस्त्यांवरील प्रदूषणामुळे डोळे, त्वचेच्या आजारांचीही बाधा

मुंबईतील वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, नियंत्रणासाठी अपुरे मनुष्यबळ अशा विविध कारणांमुळे वाहतूक पोलिसांना ताणतणावाशी संबंधित उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांना तोंड द्यावे लागत असतानाच, त्यांना अन्य शारीरिक आजारांचाही सामना करावा लागत असल्याचे आढळले आहे. मुंबई वाहतूक पोलीस आणि केईएम रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या संशोधनानुसार, रस्त्यांवरील वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे जवळपास तीन टक्के पोलिसांना बहिरेपणा आला आहे, तर वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे डोळे आणि त्वचाविकारही पोलिसांत बळावत चालले आहेत.

मुंबई शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. शहरभरात ३३ लाख वाहनांची नोंद असून दरदिवशी जवळपास ५०० ते ७०० वाहनांची यात भर पडत असते. या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शहरात दोन हजारांहून अधिक वाहतूक पोलीस उपलब्ध असले तरी यांची संख्या तुलनेने अपुरीच आहे. रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर यात तासन्तास उभे राहून काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशातून वाहतूक विभागाच्या पुढाकाराने संशोधनात्मक अभ्यास केला गेला. नुकतेच हे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ‘ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

शहरातील १९५९ वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हा अभ्यास केला असून यात २१ ते ६० वयोगटातील वाहतूक पोलीस हवालादारापासून ते सहाय्यक आयुक्तापर्यंतच्या विविध पदांवरील व्यक्तींचा समावेश आहे. या अभ्यासानुसार, वाहतूक विभागामध्ये २६ टक्के पोलिसांना ताणतणाव, तर २० टक्के उच्चरक्तदाब आणि १४ टक्के पोलीस मधुमेहाचे रुग्ण असल्याचे नोंदले गेले. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांपेक्षा या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.

सातत्याने धूळ आणि धूरामध्ये राहिल्याने श्वसनाचे, डोळ्यांचे आजारही यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळून आले. दृष्टी कमी होणे, डोळ्यांची जळजळ होणे, कोरडे होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे दुखणे या तक्रारी अधिकांश असल्याचे नोंदले गेले. याव्यतिरिक्त सोरायसिस, त्वचा गडद होणे, खाज येणे असे त्वचाविकार होतात. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे जवळपास ३ टक्के पोलीसांना काही अंशी बहिरेपणाही आलेला आहे. श्वसनाचे, कानाचे विकार आढळेले बहुंताश पोलीस हे मुख्य शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये कार्यरत असल्याचे अभ्यासात नमूद केले आहे.

प्रतिबंधात्मक उपायांची गरज

वाहतूक पोलीसांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी कामाच्या ठिकाणी उपाययोजनांचे नियोजन करावे. मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांचे वेळेत निदान करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर शारीरिक चाचण्या कराव्यात. संरक्षक साधनांच्या वापराबाबत जनजागृती निर्माण केली जाऊन यांचा वापर का केला जात नाही याची कारणमीमांसा शोधणारा अभ्यास केला जावा, असे सूचित केल्याचे या अभ्यासाच्या प्रमुख लेखक डॉ. रुपाली साबळे यांनी सांगितले.

संरक्षक साधनांचा वापर अत्यल्प

पोलिसांकडून मास्क, ऑक्सिजन थेरपी, प्रेशर स्टॉकिंग या सरंक्षक साधनांचा वापर मात्र अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. ६० टक्के पोलीसच मास्कचा वापर करत असून अधिकाधिक एक तास वापरतात. सतत उभे राहिल्याने पायावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रेशर स्टाॉकिंगचा वापर १६ टक्के पोलीस करत असून तेही फार कमी कालावधीसाठी करतात. कामाच्या ठिकाणी असणारे आरोग्याचे धोके याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने संरक्षक साधनांचा वापर कमी केला जात असावा, असे ही अभ्यासात मांडले आहे

वाहतूक पोलिसांमधील आजारांची स्थिती

आजार                     प्रमाण

मानसिक ताणतणाव         २६ टक्के

उच्च रक्तदाब              २०.९ टक्के

मधुमेह                    १४.२ टक्के

म्डोळ्यांचे विकार            १०.२ टक्के

त्वचाविकार                 ३.६ टक्के

कानांचे विकार               ३.३ टक्के

श्वसनाचे आजार              १ टक्के

वाहतूक विभागामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या समस्या दिसत होत्या. मी स्वत: डॉक्टर असल्याने वाहतूक पोलिसांच्या आरोग्यावर संशोधनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे, असे वाटत होते.

वाहतूक पोलीस विभागाकडे हा अभ्यास सादर करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जाईल.

– डॉ. सौरभ त्रिपाठी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ चार) आणि अभ्यासाचे लेखक