कळंबोळी येथे आढळून आलेल्या टाइमबाम्ब  प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे. हा बॉम्ब  आयइडी ( इंटेन्सिव्ह एक्सप्लायजीस्ट डिव्हाईस) तंत्राने बनवण्यात आल्याचे समोर आले असून,  या तिघांकडून आणखी एक जिवंत बॉम्बही हस्तगत करण्यात आला आहे. या बॉम्बमध्ये अमोनिया नायट्रेट आणि जिलेटीनचा वापर करण्यात आला होता. या बॉम्बचा वापर बिल्डरला धमकावून दोन कोटींची खंडणी  मागण्यासाठी केला जाणार होता, अशी नवी मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे.

याप्रकरणी पुणे  येथे राहणारा सुशील साठे तर नवी मुंबईतील उलवे येथे राहणारे मनिष भगत आणि दीपक दांडेकर यांना अटक करण्यात आली आहे.  या तिघांनी हा बॉम्ब तयार करून १६ जून रोजी सुधागड हायस्कुलच्या जवळ हातगाडीवर ठेवला होता. मात्र पोलिसांनी हा बॉम्ब निकामी केला होता.  या तिन्ही आरोपींवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. यासाठी त्यांनी एका बिल्डरच्या घराच्या परिसरात बॉम्ब स्फोट घडवून आणत त्याला उर्वरित बॉम्बची धमकी दाखवून त्याच्याकडून दोन कोटी रुपये वसुल करण्याची तिघांची योजना होती.

दीपक दांडेकर याची दगडखाण असल्याने या आरोपीला बॉम्ब बनवायच तंत्र माहीत होतं. मात्र बॉम्ब स्फोटासाठीची वेळ जुळवता आली नसल्याने  बॉम्बचा स्फोट होऊ शकला नाही. हे तिन्ही आरोपी कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित नसल्याची  पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.