दर रविवारप्रमाणे या रविवारीही मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर अभियांत्रिकी कामामुळे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ आणि गोरेगाव या दरम्यान, मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा या दरम्यान आणि हार्बर मार्गावर पनवेल व नेरूळ या स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर मुलुंड आणि माटुंगा या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार आहेत. या गाडय़ा शीवपर्यंत सर्व स्थानकांवर थांबवण्यात येतील. धीम्या गाडय़ांची वाहतूक १५-२० मिनिटे उशिराने चालणार आहे.
हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ या स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर ११ ते ३ दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाईल. या दरम्यान मुंबईहून व ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या गाडय़ा नेरूळपर्यंत चालवल्या जातील.
 पनवेलहून ठाणे व मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा नेरूळपासून चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेमार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर १०.३५ ते ३.३५ या वेळेत मेगाब्लॉक आहे. या काळात सर्व धीम्या गाडय़ा जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा विलेपार्ले स्थानकात दोन वेळा थांबवण्यात येतील. या मेगाब्लॉकमुळे काही सेवा रद्द केल्या जाणार आहेत.