तीन दिवसांत तिघांची आत्महत्या

मुंबई आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात विविध ठिकाणी विविध वयोगटांतल्या व्यक्तींनी आत्महत्या केल्या. बुधवारी पवईतील हॉटेलमध्ये संजीव राजोरिया (३४) या एमटीएनएलमधील अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर गुरुवारी विक्रोळीत शेअर व्यवसायातील सल्लागार पवन पोतदार (५२) आणि शुक्रवारी टाटा मोटर्समध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर काम केलेल्या प्रशांत सिबल (४२) यांनी आयुष्य संपविले.

सिबल यांच्या आईचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्या घटनेचा प्रभाव सिबल यांच्यावर होता, अशी माहिती मिळाल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सिबल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी पुढील तपासासाठी हस्तगत केली. सुमारे दीड पान इंग्रजीतला मजकूर असून त्यात दोन मुलांचे शिक्षण, भविष्यातील उदरनिर्वाह याबाबत सिबल यांनी लिहिले आहे. मला माफ करा, मी चांगला कुटुंबप्रमुख बनू शकलो नाही, असाही उल्लेख आहे. संपत्तीचे सविस्तर विवरणही चिठ्ठीत दिले आहे, असे उगळे यांनी सांगितले.

सिबल यांच्या मृत्यूबद्दल टाटा मोटर्सने खेद व्यक्त केला असून या प्रकरणात पोलीस तपासाला पूर्ण सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, शेअर व्यवसायात सल्लागार असलेल्या पोतदार यांनी गुरुवारी सकाळी विक्रोळीतल्या कैलाश पार्कमधील कार्यालयात गळफास घेतला. कार्यालयातील कामगाराने पोतदार यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात राहणारे पोतदार आजारी होते. त्यांना हृदयविकार, मधुमेह अशा व्याधी होत्या. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिल्याचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले. पार्कसाइट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत पुढील चौकशी सुरू केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

राजोरीया आत्महत्या प्रकरणात कुटुंबीयांकडून केलेल्या आरोपांची शहानिशा पवई पोलिसांकडून सुरू आहे. राजोरीया एमटीएनएलमध्ये साहाय्यक व्यवस्थापकीय संचालक होते. तेथेच काम करणाऱ्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजोरीया यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप पत्नी नीलम यांनी केला आहे. पोलिसांनी त्यापैकी काहींची चौकशी केल्याची माहिती मिळते. याआधी रविवारी अंधेरीत मनप्रितसिंग सहांस या नववीतल्या विद्यार्थ्यांने इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. भांडुपमध्ये कर्जाच्या तगाद्याला कंटाळून रवींद्र कदम (५०) यांनी गळफास घेतला, तर साकिनाक्यात गुरुवारी एका २२ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी घेत आपले आयुष्य संपविले होते.

टाटा मोटर्सच्या माजी अधिकाऱ्याने आयुष्य संपविले

सिबल यांनी परळच्या कल्पतरू हॅबिटॅट इमारतीच्या १५व्या मजल्यावरून शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केली. ते कुटुंबासोबत याच इमारतीत वास्तव्यास होते. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत पुढील चौकशी व तपास सुरू केला आहे. सिबल यांनी एप्रिल महिन्यात टाटा मोटर्स कंपनीमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याआधीपासून सिबल मानसिक तणावात होते. ते घरात स्वत:ला कोंडून घेत, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.