केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत ठाण्यातील तीन विद्यार्थी चमकले आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या सी.डी.देशमुख प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांनी परीक्षेची तयारी केली होती. ठाण्यातील भुपेंद्र भारद्वाज हा देशात ५९० क्रमांकाने तर बदलापूरची स्नेहल कार्ले ही विद्यार्थीनी ७१७ क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. ठाण्यातील डॉ. कविता पाटील ही आणखी एक विद्यार्थीनी ८९० क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
ठाण्यातील सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील ३४ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९ जण मुलाखत प्रक्रियेपर्यंत पोहचले होते. त्यातून तीन विद्यार्थीनी या परीक्षेत बाजी मारली. ठाण्यातील महात्मा फुले नगर येथे राहणारी डॉ. कविता पाटील ८९० व्या स्थानावर आहे. कविताने नाशिक येथून वैद्यकीय अभ्यास पूर्ण केला आहे. दुसऱ्या प्रयत्नात तिने हे यश मिळवले असून यापूर्वी ती मुलाखतीपर्यंत पोहचली होती. बदलापूरची स्नेहल कार्ले हिनेसुद्धा दुसऱ्या प्रयत्नामध्ये हे यश मिळवले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या चेंबुर येथील शाळेमध्ये शिक्षक असलेल्या गोविंद कार्ले यांची स्नेहल मुलगी आहे. बिर्ला महाविद्यालयातून अभ्यास पूर्ण केलेल्या स्नेहलला तिचा मित्र सर्वेश कन्होजी याचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितल़े