कॉर्पोरेट क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेल्या पीटर मुखर्जी यांची दुसरी पत्नी इंद्राणी हिला अटक झाल्याने तीन वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली; परंतु मुंबई पोलिसांच्या अधिकृत नोंदीनुसार २०१२ पासून आतापर्यंत तब्बल एक हजारहून अधिक मृतदेहांची ओळख पटविण्यातही पोलिसांना यश आलेले नाही. त्यापैकी काही मृतदेह हे अज्ञात मारेकऱ्यांनी खून करून टाकल्याचा संशय वाटून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु मृतदेहाची ओळख पटवून खुन्यांना पकडण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नसल्याचे दिसून येते. शीना बोराइतके वलय या प्रकरणांना नसल्यामुळेच ती गुलदस्त्यात राहिली नाहीत ना, असा सवाल केला जात आहे.

शीना प्रकरणात हायप्रोफाइल टीप मिळाल्यामुळे सारी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली; परंतु असे वलय नसलेल्या प्रकरणात टीप मिळाली तरी पोलिसांकडून लक्ष दिले जाते का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळेच या प्रकरणांची उकल होण्याऐवजी अद्याप मृतदेहाचीच ओळख पटविणे सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर अशा अज्ञात मृतदेहांची छायाचित्रांसह माहिती देण्यात आली आहे. १ जानेवारी २०१२ पासून ते आजतागायत मुंबईत सापडलेल्या अज्ञात मृतदेहांचा त्यात समावेश आहे. या काळात एक हजार ५६ मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटलेली नाही. यापैकी अनेक मृतदेहांची स्थिती पाहिल्यावर त्यांची हत्या करून कुणी अज्ञात व्यक्तींनी मृतदेह टाकून दिल्याचे स्पष्ट वाटत असल्यामुळे काही प्रकरणांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर काही प्रकरणांत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खुनाचा गुन्हा नोंदविला की त्याची उकल करण्याची जबाबदारी पोलिसांवर येते. परंतु मृतदेहाचीच ओळख पटली नाही तर खुनाची उकल कशी करणार, असा युक्तिवाद करीत ही प्रकरणे बऱ्याच वेळा बंदही केली जातात. शीना बोरा प्रकरणातही एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह रायगड पोलिसांना सापडला होता. अपघाती मृत्यू किंवा खुनाचा गुन्हा दाखल न करता फक्त डायरीत नोंद केली गेली. मुंबईत सापडलेल्या मृतदेहांबाबतही बऱ्याचदा डायरीत नोंद करून घेऊन मृतदेहाची ओळख पटायची आहे, असे कारण दिले जाते.

मृतदेहांची संख्या
’२०१२ – २९३
’२०१३ – २८०
’२०१४ – २९७
’ऑगस्ट २०१५ पर्यंत – १८६.

प्रत्येक खुनाची उकल व्हावी असाच पोलिसांचा प्रयत्न असतो. ओळख न पटलेल्या मृतदेहाची ओळख पटावी, यासाठी कसून प्रयत्न केले जातात. प्रत्येक वेळी अशा प्रकरणांचा आढावा घेतला जातो. अशा अनेक प्रकरणांची उकलही झालेली आहे.
-राकेश मारिया, पोलीस आयुक्त