एसटी महामंडळात चालक-वाहक  (ड्रायव्हर-कम-कन्डक्टर) पदाच्या भरतीसाठी सुरू केलेले तीन  हजार इच्छूक उमेदवारांचे प्रशिक्षण  गेल्या आठ महिन्यांपासून बंदच आहे. परिणामी हे उमेदवार अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत असून  त्याबाबत अद्यापही महामंडळाने निर्णय घेतलेला नाही.

मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागताच एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यात एसटीचे विविध कामकाजही बंद झाले. एसटीच्या भरती प्रक्रियेवरही याचा मोठा परिणाम झाला. महामंडळाने तीन हजार चालक-वाहकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून यात २१३ महिलांचाही समावेश आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. करोनाकाळात हे प्रशिक्षण पूर्णपणे थांबले आणि नोकर भरतीची पुढील प्रक्रियाही रखडली.

गेल्या वर्षी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या  उपस्थितीत २३ ऑगस्टला पुण्यातील कार्यक्र मात महिला चालक-वाहकांच्या प्रशिक्षणाला आरंभ झाला होता. अशा २१३ महिला चालक—वाहक सेवेत आणण्यासाठी एसटीने तयारी के ली. यामध्ये २१ आदिवासी महिलाही आहेत. त्यांच्याकडे हलक्या वाहनांचा परवाना असल्याने त्यांना तात्पुरता अवजड वाहन परवाना देऊन  प्रशिक्षणास सुरुवात झाली होती.  करोनाकाळात त्यांच्याही नोकरभरतीला फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले. महिलांच्या प्रशिक्षणाच्या कालावधी एक वर्षांचा आहे. यातील आठ महिने वाया गेले असून पुढील आदेश येईपर्यंत प्रशिक्षण बंद ठेवले आहे. प्रशिक्षणानंतर या महिलांना कायमस्वरुपी वाहन परवाना देऊन सेवेत आणले जाणार आहे. परंतु ही प्रक्रि या लांबल्याचे सांगण्यात आले.

पुढील वर्षी एप्रिलनंतरच भरती

डिसेंबर २०२० पर्यंत २१ आदिवासी महिला, त्यानंतर टप्प्याटप्प्यांत ऊर्वरित महिलाही एसटीच्या सेवेत रुजू होणार होत्या. आता पुढील वर्षी एप्रिल नंतरचाच मुहूर्त मिळणार असून पुरुष चालक—वाहकही थेट नव्या वर्षांतच सेवेत येतील.

करोनाकाळात खबरदारी म्हणून नव्याने येणाऱ्या चालक-वाहकांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याचा विचार महामंडळ करत आहे.

-शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ