राज्य सरकारने अल्प उत्पन्न गटासाठी घरे बांधण्याची अट घालून कवडीमोल दराने दिलेल्या २६० एकर जमिनीवर हिरानंदानी बिल्डरने उच्चभ्रू व श्रीमंतांसाठी टोलेजंग इमारती बांधून गरिबांची ३ हजार घरे हडप केल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
राज्य सरकारने १९८७ मध्ये पवई एरिया डेव्हलपमेंट स्कीम नावाने गरिबांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र म्हाडाच्या माध्यमातून ही योजना राबविण्याच्याऐवजी ४० पैसे चौरस फूट या भावाने २६० एकर जमीन हिरानंदानी बिल्डरला देण्यात आली. ही योजना राबविताना अल्प उत्पन्न गटासाठी ४०० चौरस फुटांची ३ हजार घरे बांधण्याची अट होती. प्रति सदनिका ५४ हजार रुपये अशी किंमतही सरकारने ठरवून दिली होती. परंतु प्रत्यक्षात असे एकही घर बांधले नाही. याप्रकरणी  पोलिसांत तक्रारी दाखल करून न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे. तसेच २९ जानेवारीला आघाडीच्या वतीने दुपारी ३ वाजता कांजूर मार्ग रल्वे स्थानक ते पवई असा मोर्चा काढणार असल्याचेही आंबेडक यांनी सांगितले.