मुंबई : कसारा घाटात दरड कोसळल्याने अडकलेल्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तीन एक्स्प्रेसमधील तीन हजार प्रवाशांना गुरुवारी पहाटे सुखरूपपणे कसारा, इगतपुरी स्थानकापर्यंत आणण्याचे काम मध्य रेल्वेने केले.

कसारा ते इगतपुरीदरम्यान घाटात दरड कोसळल्यामुळे दरभंगा ते एलटीटी पवन एक्स्प्रेस, गोरखपूर ते एलटीटी कु शीनगर एक्स्प्रेस आणि अमृतसर ते सीएसएमटी एक्स्प्रेस इगतपुरी ते कसारा दरम्यान अडकल्या. बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून घाटात दरड कोसळत असल्याची माहिती मिळाल्याने या गाड्या सुरक्षित ठिकाणी थांबवण्याच्या सूचना रेल्वे नियंत्रण कक्षाने दिल्या होत्या. त्यानंतर त्वरित छोट्या-मोठ्या दरडी बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण होताच कु शीनगर एक्स्प्रेस आणि अमृतसर एक्स्प्रेस पहाटे चार व साडे चारपर्यंत टप्प्याटप्प्यात कसारा स्थानकात आणल्या व प्रवाशांना स्थानकाबाहेरून एसटीची सुविधा करून ठाणे, मुंबईपर्यंत आणण्यात आले. त्यानंतर पवन एक्स्प्रेस हळूहळू सकाळी साडे सहापर्यंत मागे इंजिन लावून पुन्हा इगतपुरी स्थानकापर्यंत आणली व या स्थानकाबाहेरूनही प्रवाशांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.