उत्तरप्रदेशातून पळून मुंबईत आलेल्या एका १७ वर्षीय तरुणीवर बोरिवलीत चौघांनी सामूहिक बलात्कार केला. बोरिवलीच्या लिंकिंग रोडवर सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात राहणारी सपना (नाव बदललेले) आईशी भांडण झाल्याने काही महिन्यांपूर्वी घर सोडून मुंबईत आली होती. मुंबईत तिची कैलाश नावाच्या एका कडिया काम करणाऱ्या तरुणाशी ओळख झाली होती. या कैलाशने तिला बोरिवलीच्या हनुमान नगर परिसरात एक छोटे घर घेऊन दिले होते. सपना या घरात एकटीच राहात होती. तिला घरखर्चाला हा कैलाश पैसे देत होता. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी सोनू कांबळे (२३) हा रिक्षाचालक आणि त्याचे तीन मित्र दबा धरून बसले होते. सोनू याच परिसरात राहातो. सपन त्याला ओळखत होती. या चौघांनी सपनाला लिंकिंग रोडवरील शहीद तुकाराम ओंबळे उद्यानासमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोत नेले. या पसिरात रात्री शुकशुकाट असतो. या चौघांनी टेम्पोचे शटर बंद करून सपनावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्या भागातून जाणाऱ्या एका नागरिकाला टेम्पोत गडबड असल्याचे जाणवले. त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्याला हा प्रकार दिसला. त्याने पळून जाणाऱ्या एका आरोपीला पकडले आणि गस्तीवरील पोलिसाला कळवले. त्यांनी अन्य आरोपींना अटक केली.
एमएचबी पोलिसांनी सोनू कांबळे याच्यासह जयप्रकाश पाल (२३) आणि अस्लम नबाब मलिक शेख (२५)या तिघांना अटक केली. तर अन्य एक जण पळून गेला. हे सर्व आरोपी त्याच परिसरात राहणारे असून सपना एकटी रहात असल्याचे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी ठरवून हा बलात्कार केल्याची माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खिलजे यांनी दिली. ही मुलगी मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त नाही. तिचा प्रियकर कैलाश गोरेगाव येथे राहतो. पण घटनेनंतर तो अद्याप सापडलेला नसल्याचे खिलजे यांनी सांगितले. या चौघा आरोपींवर बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही आरोपींना २ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.