विरारमधल्या रेल्वे स्थानकामध्ये किकी चॅलेंजमध्ये स्टंट करणाऱ्या तिघांना रेल्वे कोर्टाने एक अनोखी शिक्षा सुनावली आहे. या मुलांनी आता रेल्वे स्थानकांमध्ये स्टंट करणं कसं धोकादायक आहे याचा प्रचार करावा तसंच रेल्वे स्थानकाची सफाई करावी अशी शिक्षा दिली आहे. तीन दिवस त्यांना हे काम करावं लागणार असून किकी चॅलेंजचा स्टंट करण्यापोटी हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे.
किकी चॅलेंज म्हणून या तरूणांनी रेल्वेस्थानकात स्टंट केले होते. सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालेले हे चॅलेंज या तीन तरुणांना महागात पडले. सुमारे दोन लाख जणांनी त्यांचा हा व्हीडियो पाहिला होता. आरपीएफने विरारमधून निशांत (वय २०), ध्रूव शाह (वय २३) आणि श्याम शर्मा (वय २४) या तिघांना बुधवारी अटक केली. त्यानंतर रेल्वे कोर्टात त्यांना हजर केले असता अशी आगळीवेगळी शिक्षा त्यांना सुनावण्यात आली.
धावत्या लोकलमध्ये ‘किकी चॅलेंज’ पडले महागात, विरारमधून तीन तरुणांना अटक
हा व्हिडिओ ध्रूव शहा आणि त्याच्या दोन मित्रांनी तयार केला होता. या व्हिडिओत एक तरुण लोकलमधून उतरतो आणि प्लॅटफॉर्मवर डान्स करायला लागतो, त्यानंतर पुन्हा तो धावत्या लोकलमध्ये चढतो. हा सर्व प्रकार त्याचे दोन मित्र मोबाईलवर शूट करत असल्याचे दिसत होते.
किकी चॅलेंजसारखे प्रकार धोकादायक असून त्यामुळे कुणाच्या जीवावर बेतू शकते. तसेच अन्य तरूणही याचं अनुकरण करतील आणि जास्त जणांचा जीव धोक्यात येईल अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला होता. यानुसार रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने विरारमधून ध्रूव आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 12:04 pm