महिलांची छेडछाड, बलात्कार यांसारख्या घटना समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय कमी होणार नाहीत. मात्र, कोणीही तुमची छेडछाड वा विनयभंग करण्याचा प्रयत्ना केल्यास त्याच्या डोळय़ांत मिरचीपूड फेका, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी बुधवारी महाविद्यालयीन विद्यार्थीनींना केले.
डोंबिवलीत गेले काही महिन्यापासून घडणाऱ्या दुर्देवी घटनांच्या पाश्र्वभूमीवर के. व्ही. पेंढरकर, प्रगती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी बुधवारी सकाळी डोंबिवलीत आले होते. यावेळी आयुक्तांनी उद्विग्नपणे मुलींनी आता जवळ मिरची पूड ठेवावी. कोणीही तुमची छेडछाड, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तर जवळील पूड त्याच्या डोळ्याच्या दिशेने फेका. तात्काळ पोलिसांना संपर्क साधा. असे मुलींना सांगताच त्यांच्या भुवया उंचावल्या. पोलिसांच्या कुचकामीपणाचा आयुक्तांनी समाचार घेतला. पोलिस सोबतीला आहेतच पण समाजानेही आपली भूमिका बदलल्याशिवाय या घटना कमी होणार नाहीत, असेही आयुक्त रघुवंशी म्हणाले. यावेळी उपायुक्त प्रशांत मणेर, साहय्यक आयुक्त राजन घुले उपस्थित होते.