‘वाघांच्या डरकाळ्यांनी’ राज्यातील राजकारणात सध्या खळबळ उडवून दिली असली तरी, ख-याखु-या वाघांच्या डरकाळ्या काय, वाघही कमी होऊ लागले आहेत. हीच बाब हेरून राज्य सरकारने मंत्रालयाच्या दर्शनी भागामध्ये वाघाची प्रतिकृती उभारून या ठिकाणी ‘सेल्फी पॉईंट’ तयार केला आहे. बुधवारी या ‘सेल्फी पॉईंट’चे उद्घाटन झाल्यानंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि या ‘वाघा’सोबत सेल्फी काढला. ‘वाघाशी मैत्री’ हा या सेल्फी पॉईंटमागील मुख्य हेतू आहे. पण राजकारणातील ‘वाघा’शी मैत्री टिकवणे, हाच मुख्यमंत्र्यांसमोरील मुख्य अजेंडा आहे.

‘फायबर व्याघ्रप्रेम’!
‘जबडय़ात घालुनी हात मोजतो दात, जात ही अमुची’ असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यापासून सत्तेतील वाघ-सिंहाचे सख्य काहीसे बिघडले होते. मात्र मध्यंतरी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाघाची फायबरची प्रतिकृती भेट देण्यासाठी ‘मातोश्री’ गाठली, आणि वाघाला चुचकारले. ‘वाघ वाढले पाहिजेत’, असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि मुनगंटीवारांनी मान हलवून त्याला पाठिंबाही दिला. एकंदरीत, वाघांना चुचकारण्याचे दिवस राज्यात सुरू झाले आहेत. आता तर चक्क मंत्रालयातच एका उमद्या वाघाची प्रतिकृती विराजमान झाली आहे. मंत्रालयात येणाऱ्या कोणासही या नकली वाघासोबत सेल्फी काढण्याचीही मुभा देण्यात येणार आहे. वाघाशी कसेही वागा, तो शांतपणे सेल्फी काढू देईल, असा संदेश तर सरकार जनतेला देत नाही ना, अशी कुजबुज लगेचच सुरू झाली आहे. वनमंत्री मुनगंटीवार तर वाघांच्या प्रदेशातच वावरणारे असल्याने, फायबरचे वाघ उपद्रवकारक नाहीत, या खात्रीनेच मंत्रालयाच्या उघडय़ा प्रांगणात वाघाला जागा दिल्याचे बोलले जात आहे.