ठाण्यामध्ये पट्टेरी वाघाची कातडी विकण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेच्या वागळे युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वाघाच्या कातडीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे किंमत २५ लाख रुपये असून भारतीय बाजारपेठेत तिची किंमत पाच लाख असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी नाशिक येथील सचिन विधाते (३६) आणि भाईंदर येथील बुध्दीवंत जाधव (३७) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यातील तीन हात नाका येथील बेस्ट बस स्थानकाजवळ शनिवारी दुपारी वाघाचे कातडे विकण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शहाजी जाधव यांनी सापळा रचला होता. कातडी घेऊन या भागात आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पट्टेरी वाघाचे कातडे आणि चारचाकी वाहन असे एकुण सात लाखांचा ऐवज हस्तगत केला. पकडलेली कातडी ही वाघाचीच सत्यता पडताळण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.त्यावेळी तपास करून ही कातडी वाघाचीच असल्याचे निष्पन्न झाले. सचिन आणि बुध्दीवंत यांना अटक करण्यात आली आहे. परदेशात या कातडीची किंमत २५ लाख तर भारतामध्ये तीची किंमत ५ लाख आहे. हे दोघे नाशिक येथून आले असल्याचे तपासात उघड झाले असले तरी ही कातडी घेऊन ती विकण्यासाठी ते कुठे जात होते यांचा पोलीस तपास करीत आहेत.