टाळेबंदीमुळे वर्षभरातल्या ६० टक्के उलाढालीवर पाणी

सुहास जोशी, लोकसत्ता 

मुंबई : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वन्यजीव पर्यटन व्यवसायास सुमारे ६० टक्के  फटका बसला आहे. वन्यजीव पर्यटनात सर्वाधिक पर्यटकांचा कालावधी हा एप्रिल ते जून असा असून, त्यानंतर पावसाळ्यात अभयारण्ये बंद असल्याने व्यवसाय ठप्प असतो. त्यामुळे यावर्षी वन्यजीव पर्यटन व्यवसायातील महत्त्वाच्या काळातील उलाढालीवर पाणी सोडावे लागले आहे.

टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात वन्यजीव पर्यटनावर बंदी घालण्यात आली. तर वन्यजीव पर्यटन पुढील आदेश येईपर्यंत बंदच ठेवण्याचे निर्देश राज्याच्या वनविभागाने नुकतेच दिले आहेत. त्यामुळे वर्षांतील सर्वाधिक काळ पर्यटक असणाऱ्या या काळातच व्यवसाय ठप्प झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

पर्यटनाचा हंगाम

एप्रिल ते जून या काळात व्याघ्र पर्यटनासाठी पूरक असणाऱ्या विदर्भातील ताडोबा, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, टिपेश्वर या व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये पर्यटकांची गर्दी सर्वाधिक असल्याचे वन्यजीव पर्यटन व्यावसायिक मकरंद जोशी यांनी सांगितले. हमखास होणारे व्याघ्र दर्शन आणि छायाचित्रणाची संधी यामुळे अर्ध्याहून अधिक पर्यटक हे ताडोबालाच प्राधान्य देतात असे त्यांनी नमूद केले.

एप्रिल ते जून या काळातील व्याघ्र पर्यटकांची संख्या सुमारे सव्वा लाख इतकी आहे. या काळात वन खात्यास प्रवेश शुल्क माध्यमातून मिळणारा महसूल (सुमारे चार ते साडेचार कोटी रुपये) हा वर्षांतील एकूण महसुलाच्या निम्मा असतो. यावर्षी या महसूल मिळणार नसल्याचे ते नमूद करतात.

पर्यटकांसाठी हॉटेल व्यवस्था, सफारीसाठी वाहन, वन्यजीव मार्गदर्शक या बहुतांश सुविधा स्थानिक पातळीवरील मनुष्यबळाच्या माध्यमातून पूर्ण होतात. राज्यातील महत्त्वाच्या व्याघ्र पर्यटनाच्या ठिकाणी मिळून दिवसाला सुमारे २०० सफारी होत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. याच्या किमान दुप्पट संख्येने वाहन चालक-मालक आणि वन्यजीव मार्गदर्शकांची संख्या वन्यजीव पर्यटनावर अवलंबून आहे.

वन्यजीव पर्यटनामध्ये हॉटेलचालकांसाठी वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा काळ हा एप्रिल ते जून हा असून, या काळात वर्षांतील ६० ते ७० टक्के व्यवसाय होत असल्याचे ताडोबा येथील हॉटेलमालक प्रमोद भोयर यांनी सांगितले. पावसाळ्यानंतर अभयारण्ये खुली झाली की नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये केवळ शनिवार-रविवार आणि मोठय़ा सुट्टय़ांनाच पर्यटक येत असल्याचे भोयर यांनी सांगितले.

स्थानिकांना फटका

गेल्या काही वर्षांत व्याघ्र पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर हॉटेल कर्मचारी, हॉटेलला सुविधा देणारे व्यावसायिक, वाहन चालक-मालक, घरगुती राहण्याची सुविधा पुरवणारे, वन्यजीव मार्गदर्शक अशी एकमेकांवर अवलंबून असलेली साखळी तयार झाली असून त्यांच्यासाठी हा मोसम महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे अनेकांच्या जीवनशैलीतदेखील बदल झाला असून सध्याच्या स्थितीमुळे सामाजिक आर्थिक परिणामदेखील मोठा असल्याचे ताडोबा येथील पर्यटन व्यावसायिक शालिक जोगवे यांनी सांगितले.

मोठी उलाढाल

एका सफारीसाठी सहा जणांच्या वाहनास सुमारे दोन हजार ते तीन हजार रुपये आकारले जातात. वन्यजीव मार्गदर्शकास सुमारे ३५० रुपये प्रति सफारी मिळतात. या काळातील व्याघ्रदर्शन आणि छायाचित्रण संधी उत्तम मिळत असल्याने मार्गदर्शकास टीपदेखील चांगली मिळते. मुंबई-पुण्यातून निघणाऱ्या वन्यजीव पर्यटन सहलींचे पॅकेज हे प्रतिमाणशी सुमारे २० ते ४० हजारच्या दरम्यान असते.