शेतकरी मोर्चानिमित्त मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. राज्याच्या विविध भागांमधून मोर्चात सहभागी होण्यासाठी एकत्र आलेला शेतकऱ्यांचा जमाव रविवारी सायंकाळी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात विसावला. सोमवारी सकाळी हा जमाव आपल्या प्रलंबित मागण्या सरकारसमोर ठेवण्यासाठी आझाद मैदानात धडकू शकेल. या पाश्र्वभूमीवर मुलुंड ते आझाद मैदान दरम्यान टप्प्याटप्प्यावर स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल विरोधी पथकाचे सशस्त्र जवानांचा बंदोबस्त आहे.

मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी शिस्त पाळावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याशिवाय मोर्चामुळे शहरात वाहतूक खोळंब्यासह अन्य प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी बंदोबस्त ठेवल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महत्त्वाच्या टप्प्यांवर राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल विरोधी पथक, मुंबई पोलिसांची वज्र पाणतोफ, श्वान पथक सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. याशिवाय साध्या गणवेशातील अधिकारी मोर्चात मिसळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेणार आहेत. त्यासोबत मुख्य नियंत्रण कक्षासह, पूर्व, मध्य आणि दक्षिण प्रादेशिक विभागातील नियंत्रण कक्षांमध्ये सीसीटीव्हींच्या माध्यमातून मोर्चावर  नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

रविवारी मोर्चा मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यापर्यंत आला. तेथे एकत्र होऊन तो सोमय्या मैदानापर्यंत आला. मोर्चाचा आणि मुंबईकरांचा प्रवास विनाअडथळा व्हावा यासाठी परिमंडळ सात आणि सहामधील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर होते. वाहतूक पोलिसांनी रविवारी सकाळी नऊ ते रात्री १० वाजेपर्यंत पूर्व द्रुतगती मार्गावरील दक्षिण वाहिनी म्हणजे आनंद नगर टोलनाक्यापासून सोमय्या मैदानापर्यंतचा मार्ग अवजड वाहनांसाठी आणि मालवाहू वाहनांसाठी बंद ठेवला होता. दुपारी दोनच्या सुमारास मोर्चाने मुंबईच्या हद्दीत प्रवेश केला. मोर्चातील वाहने उड्डाणपुलांवरून तर शेतकऱ्यांच्या जमावाला सव्‍‌र्हिस रोडवरून सोमय्या मदानापर्यंत आणण्यात आले. यावेळी छेडानगर, अमरमहल, सुमन नगर या मोठय़ा चौकांमध्ये सव्‍‌र्हिस रोड उपलब्ध नसल्याने मोर्चा मुख्य मार्गावरून पुढे नेण्यात आला.

..तरीही निर्धार कायम

प्रलंबित मागण्यांसाठी कडक उन्हाची, मुंबईतील उकाडय़ाची तमा न बाळगता शेकडो मैल पायपीट करत मुंबईच्या दारावर रविवारी दुपारी शेतकरी जमाव उभा ठाकला.  कापडाचा  एक जोड, जेवणाचा डबा अशी एकही वस्तू त्यांच्या हाती नव्हती. फक्त पाण्याची बाटली तेवढी त्यांच्या हाती दिसत होती. अनेक शेतकरी अनवाणी मोर्चात सहभागी झाले होते. आनंदनगर टोल नाक्यावर जेवणासाठी थांबल्यानंतर उन्हात चालल्याने अनेकांच्या तळव्यांना  फोड आले होते. तरीही हटणार नाही असाच मोर्चेकऱ्यांचा निर्धार होता. दरम्यान, मुलुंड ते सोमय्या मैदानापर्यंत वस्त्यांमधून मोर्चेकऱ्यांना पाणी, चहा-बिस्किटांचे वाटप करण्यात आले.