कुरारच्या व्यावसायिकासह सहा कुटुंबीय गजाआड

बिहारहून अर्थार्जनासाठी मुंबईत आलेल्या बारा वर्षांच्या रणवीरची(नाव बदलले आहे) तो मजुरी करतो त्या कारखान्याच्या मालकाच्या मुलाशी बाचाबाची होते. त्यात त्याची हत्या केली जाते. ही हत्या दडविण्यासाठी कारखान्याचे मालक दाम्पत्य, मुलगा आणि कुटुंबीय एकत्र येतात. रणवीरचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून ती लोकमान्य टिळक टर्मिनन्सवरून सुटणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये सोडून गायब करण्याचा कट आखतात. याहून धक्कादायक बाब ही की आरोपींचा एक प्रतिनिधी बिहारच्या वैशाली जिल्हय़ात राहणाऱ्या रणवीरच्या गरीब कुटुंबाला भेटतो. तुमच्या मुलाचा आजारपणात मृत्यू झाला. अंत्यसंस्कार आम्ही उरकले आहेत. तुम्ही हे १ लाख ११ हजार ठेवा आणि विषय इथल्या इथे मिटवा, अशी गळ घालतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे कुटुंबीय हे पैसे स्वीकारतात आणि आपल्या मुलाला नेमके काय झाले होते, याची साधी चौकशीही करीत नाहीत. लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथे जानेवारी महिन्यात सुटकेसमध्ये आढळलेल्या अल्पवयीन मुलाच्या मृतदेहाचा हा गुंता टिळकनगर पोलिसांनी अखेर सोडवला.

कुरार गावातील बांगडय़ा (इमिटेशन ज्वेलरी) बनविण्याच्या कारखान्यात रणवीर सहा महिन्यांपासून काम करीत होता. हा कारखाना शिवनाथ सहानी यांच्या मालकीचा आहे. कारखान्यात मजुरी करणारे रणवीरसह एकूण १५ मजूर सहानी यांच्या घराच्या पोटमाळय़ावर राहत होते. सहानी यांचा मुलगा रणविजय याची ७ जानेवारीच्या रात्री अकराच्या सुमारास अल्पवयीन रणवीरसोबत बाचाबाची घडली होती. रणवीर सकाळी उशिरा उठे, जेवण करीत नसे, जेवत नसे. यावरून दोघांमध्ये वाजले. रागाच्या भरात रणविजयने रणवीरचे नाक-तोंड दाबले. त्यात रणवीरचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बाब स्पष्ट झाली आणि सहानी कुटुंबाने ती दाबण्यासाठी हालचाली सुरू केल्या. उर्वरित मजुरांना धमकावून गप्प केले गेले. रणवीरचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून तो पुरी एक्स्प्रेसमध्ये चढवण्याचा बेत आखण्यात आला. ठरल्याप्रमाणे सुटकेस टर्मिनन्सबाहेर आणण्यात आली. पण प्रवेशद्वारावर सुरू असलेली झाडाझडती पाहून आरोपी सहानी कुटुंब घाबरले. सुटकेस बाहेरील रस्त्याच्या रुंद दुभाजकावर सोडून सर्वानी पळ काढला. इतक्यात टर्मिनन्सवर घुटमळणाऱ्या गर्दुल्ल्याने बेवारस सुटकेस पळवली. त्यात निश्चित काही तरी किमती मिळेल, अशी त्याची आशा होती. मात्र त्यात लहान मुलाचा मृतदेह पाहून त्याने ती बॅग पुन्हा टर्मिनन्स परिसरात आणून सोडली. त्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली.