‘राहुल गांधी यांच्या निवडीचा निर्णय हा त्यांचा पक्षाचा आहे. प्रत्येक पक्षाला आपला नेता निवडण्याचा अधिकार आहे. आमच्यावर मात्र अद्याप सुुप्रियाच्या हाती नेतृत्व सोपविण्याची वेळ आलेली नाही,’ असा टोला शरद पवार यांनी काँग्रेसला उद्देशून शनिवारी हाणला. पवार हे पंतप्रधान म्हणून राहुलचे नेतृत्व मान्य करणार नाहीत हे या टीकेतून स्पष्ट झाले. राहुल गांधी यांच्यावर यापूर्वीही टीका करण्याची संधी पवार यांनी सोडली नव्हती. राहुल गांधी दौऱ्यात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना बरोबर घेत नाहीत, अशी टिप्पणी पवार यांनी केली होती.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढता कामा नये, असाच राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांना व्यूहरचना आखण्यास त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यातूनच पवार यांनी राहुल  गांधी यांच्यावर टीका केल्याचे बोलले जाते.
राहुल गांधी यांना अद्याप पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आलेले नाही. पण काँग्रेसमध्ये अधिकृतपणे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने राहुल हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार हेनिश्चित. राहुल गांधी यांच्यासारख्या वयाने लहान असलेल्या नेत्याच्या हाताखाली काम करणे शरद पवार किंवा अन्य नेत्यांना शक्य होणार नाही. यामुळेच पवार यांनी सुरुवातीपासूनच राहुलच्या नेतृत्वावर टीकाटिप्पणी करण्याची संधी सोडलेली नाही. दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि सरचिटणीस संजय दत्त यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.