पूरग्रस्त भागातील वैद्यकीय शिबिरामध्ये आजाराचे निदान

मुंबई : पुराने सर्वाचे मोठे नुकसान झाले, हे एकीकडे खरे असले तरी याच पुरामुळे सांगलीतल्या काळीवाट गावातील जन्मजात हृदयदोष असलेल्या चिमुरडीला मात्र तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली आहे. पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या छावण्यांमध्ये या चिमुरडीला  हृदयरोग असल्याचे निष्पन्न झाले. एका खासगी संस्थेच्या मदतीने तातडीने तिच्यावर मुंबईत वाडिया रुग्णालयात पाठविले आणि सोमवारी शस्त्रक्रियादेखील झाली.

सांगलीच्या हरिपूरजवळील काळीवाट गावाला पुराने वेढले होते. १० ऑगस्टच्या रात्री गावातही पाणी शिरायला सुरुवात झाली. बचाव पथकाच्या बोटीने आम्हाला बाहेर काढले आणि जवळच्या शाळेमध्ये सोडले. ही घटना घडण्याच्या आठ दिवस आधीच शिवन्याची तब्बेत बिघडली होती. तिला कावीळ झाली असावी, असा संशय व्यक्त करून कोल्हापूरला डॉक्टरांकडे नेण्यास इथल्या डॉक्टरांनी सांगितले होते, असे शिवन्याचे वडील संदीप शिंदे सांगतात.

पूरग्रस्तांसाठी असलेल्या छावणीमध्ये आल्यानंतर शिवन्याची तब्बेत अजूनच बिघडली. तिला ताप, उलटय़ा होऊ लागल्या. तिथल्या डॉक्टरांनी तपासणी केली. पुढील उपचारासाठीही कोणी लक्ष देईना. तिथे काम करत असलेल्या एका संस्थेच्या पूनमताईंनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलविले. तिथे तिला न्यूमोनिआ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तीन दिवस उपचार सुरू असतानाच तपासण्यांमध्ये तिला हृदयविकार असल्याचे समजले.

१४ ऑगस्टला शिवन्याला मुंबईतील वाडिया रुग्णालयात कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आणण्यात आले. तिला जन्मजात हृदयरोग असून तिचे हृदयाला जोडलेल्या रक्तवाहिन्यांची रचना योग्यरीतीने नसल्याने हृदयामध्ये रक्त येऊन शुद्धीकरण झालेले रक्त पुन्हा शरीरात जाणे या प्रक्रियेमध्ये अडथळा येत आहे. अशा आजारामध्ये जितक्या कमी वयात शस्त्रक्रिया होईल तितक्या लवकर बरे होण्याची शक्यता असते. त्यामुळेच तातडीने सोमवारी शस्त्रक्रिया केली गेली, असे वाडिया रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. शकुंतला प्रभू यांनी सांगितले.