काही पदार्थाचा आकार आणि मांडणी इतकी जबरदस्त असते की ते बघूनच पोट भरतं. असा एक जबदस्त पदार्थ खाण्याचा योग नुकताच आला. पदार्थ नवीन नाहीए परंतु बनवण्याची पद्धत आणि चव मात्र विशेष आहे. खवय्यांनी एकदा तरी आस्वाद घ्यावा असा. राज कचोरी हा प्रकार मुंबईकरांसाठी तसा नवा नाही. टम्म फुगलेल्या कचोरीला एक बाजूने फोडून त्यामध्ये मूग, चटणी, दही आणि वरून शेव टाकली की साध्या कचोरीचे राज कचोरी म्हणून नामकरण होते. मात्र राज कचोरी या नावाला शंभर टक्के  जागणारी कचोरी खायची असेल तर तुम्हाला तिवारी ब्रदर्स मिठाईवाला हे दुकान गाठावे लागेल.

कोलकाता येथे ७२ वर्षांपूर्वी तिवारी ब्रदर्स मिठाईवालाची सुरुवात झाली. त्यानंतर तिवारी ब्रदर्सचा प्रवास हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई असा झाला. दुकानाचे मालक एस. के. तिवारी हे अतिशय मितभाषी व्यक्तिमत्त्व. आपणच आपली प्रसिद्धी करणं हे त्यांना पटत नाही. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणायला हवं, असं त्यांना वाटतं. त्यांच्या या वाक्याची प्रचीती तुम्हाला इथली नावाजलेली राज कचोरी खाताना येते. दुकानात गेल्यावर कूपन घेऊन राज कचोरीची ऑर्डर देऊन तुम्ही टेबलावर बसू शकता. परंतु ही राज कचोरी तयार होताना पाहणं हासुद्धा एक वेगळा अनुभव असतो. राज कचोरीची खरी मजा त्याच्या आकारात आहे. खरं तर तुम्हाला त्याचा नेमका आकार सांगताना माझी तारांबळ उडाली आहे. पण तरीही प्रयत्न करतो आणि त्यावरून तुम्हीच त्याचा अंदाज बांधा. ही राज कचोरी असते मोठय़ा ब्रेडच्या स्लाईसइतकी आणि तीसुद्धा टम्म फुगलेली. राज कचोरी तयार करताना कचोरी घेऊन त्याच्यापेक्षा मोठय़ा आकाराच्या स्टीलच्या प्लेटमध्ये ती मधोमध ठेवली जाते. कचोरी मध्यभागी फोडल्यानंतर त्यात मोठा चमचा भरून उकडलेले मूग आणि मसालेदार चणे भरले जातात. त्यावर पापडी आणि दही वडय़ासारखी पकोडी कुस्करली जाते. वर उकडलेला बटाटा फोडला जातो. नंतर एका राज कचोरीमध्ये तब्बल शंभर ते दीडशे ग्रॅमहून जास्त दही त्यात जवळपास ओतलं जातं आणि सजवण्यासाठी कचोरीच्या वरूनही पसरवलं जातं. त्यावर चाट आणि तिखट मसाला भुरभुरल्यानंतर हिरवी तिखट चटणी आणि चिंच, खजुराची गोड चटणी टाकतात. शेवटी शेव आणि कोिथबिरीने सजवून राज कचोरी तुम्हाला खायला दिली जाते. कचोरी तुमच्या समोर सादर होते तेव्हा तुमच्या मनात पहिला प्रश्न निर्माण होतो की हे एवढं कोण खाणार? यावरूनच तुम्हाला त्याचा आकार लक्षात येईल. आता आणखी मजा ऐका. या एका राज कचोरीचं वजन तब्बल अर्धा किलो भरतं. त्यामुळे तुम्हाला हलकी भूक असेल तर त्याच्या वाटय़ाला न जाणंच बरं. या राज कचोरीची किंमत एकशे दहा रुपये आहे, पण हे एवढे पसे कचोरी समोर आल्यावर जास्त वाटत नाहीत, कारण ती संपूर्ण फस्त केल्यावर तुमच्या पोटात एकही कण जागा उरत नाही.

कचोरीसाठी असो वा गोड पदार्थासाठी लागणारा प्रत्येक पदार्थ दुकानातच तयार केला जातो. कचोरी कुरकुरीत व्हावी यासाठी मद्याच्या कचोरीत रव्याचा समावेश असतो. विशेष म्हणजे ही कचोरी तुपात तळली जाते. तसंच डेरीतून तयार दही न मागवता ते स्वत:च दही जमवतात. तिवारी ब्रदर्समध्ये ४० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे राज कचोरी तयार केली जात असे तशीच आत्ताही तयार केली जाते. दिवसातून तीन ते चार वेळा मागणीनुसार कचोरी तळली जाते. इथल्या कुठल्याही पदार्थामध्ये कांदा-लसूणचा वापर केला जात नाही. समोसा हीसुद्धा त्यांची खासियत आहे. त्याचा काही छुपा फॉम्र्युला नाही. पण ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू अव्वल दर्जाच्याच असतात. लोकांना प्रेमाने खाऊ घालणं आणि पूर्वजांनी कमवून ठेवलेलं नाव टिकवणं हा आमचा उद्देश असल्याचं तिवारी सांगतात.

खस्ता कचोरी, पनीर कटलेट, मटर समोसा, घुघरा हे नमकीन पदार्थही येथे मिळतात. तसंच मिक्स चाट, दही गुजिया बारा, दही कचोरी, दही पकोडी, पापडी चाट हे दही चाटचे प्रकारही आहेत. पनीर ढोकला, खांडवी, साधा ढोकला, छोले पॅटीस, मिसी रोटी आणि गट्टे साग हे प्रकारही विशेष. केसर कुल्फी, रबडी, इंद्रायणी कप, मीठा दही, केसर-पिस्ता मिल्कशेक, मसाला मिल्क आणि लस्सी हीदेखील त्यांची खासियत आहे. मटर चाट, पालक चाट, आलू तिक्की, पनीर चिला, मूंग दाल चिला, समोसा रगडा चाट हे पदार्थही नव्याने सुरू करण्यात आले आहेत. वीस-बावीस रुपयांपासून एकशे तीस रुपयांपर्यंत या सर्व पदार्थाची किंमत आहे.

ऑपेरा हाऊससोबतच बोरिवली, जुहू, सायन येथेही त्यांच्या शाखा आहेत. त्यामुळे तुमच्या घरापासून जवळ असलेल्या कोणत्याही दुकानात जाऊन तुम्ही या कचोरीवर ताव मारू शकता. दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद येथेही ही कचोरी तुम्हाला खायला मिळेल.

तिवारी ब्रदर्स मिठाईवाला

  • कुठे- ३, पुरुषोत्तम बििल्डग, एम. पी. मार्ग, ऑपेरा हाऊसच्या समोर, चर्नी रोड, मुंबई
  • कधी- सोमवार ते रविवार सकाळी ८.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत