अनधिकृत बांधकामांचे आगार म्हणून बदनाम असणाऱ्या मुंब्रा, शीळ फाटा परिसरातील लकी कंपाउड भागातील इमारत कोसळल्यामुळे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरकारी अधिकाऱ्यांचे ‘खिसे गरम’ करून अथवा त्यांना थांगपत्ता लागू न देता असे बेकायदा बांधकाम सर्रास केले जात आहे. गुरुवारी कोसळलेली आठ मजली इमारत नाला बुजवून उभारण्यात आल्याचे उघड झाले असतानाच अवघ्या पाच दिवसांत इमारतीचा अख्खा स्लॅब उभा करण्यात आल्याचेही निष्पन्न होत आहे.
या इमारतीचे आठ मजले उभारताना अवघ्या पाच दिवसात एक स्लॅब उभा करण्यात आला होता, अशी माहिती या भागातील स्थानिक नागरिकांनी महापौर हरिश्ंचद्र पाटील यांना दिली. दोन महिन्यांत आठ मजले उभे रहात असल्याने या भागातील स्थानिक नागरिकही चक्रावून गेले होते. त्यापैकी काही नागरिकांनी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त दीपक चव्हाण यांच्याकडे तक्रारीही केल्या होत्या. काहींनी महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास यासंबंधीचे एसएमएस केले होते. तरीही या अनधिकृत इमारतीचे बांधकाम थांबविण्यात आले नव्हते. दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या नवव्या मजल्यावर पाण्याची टाकी उभारण्याचे काम होते. तेव्हा इमारतीचे प्लास्टर मोठय़ा प्रमाणावर ढासळू लागल्याच्या तक्रारी क्लासमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रात्री उशिरापर्यंत मिळालेली मृत व जखमींची संख्या
कळवा रुग्णालय :
जखमी १०, मृत ४
कळशीकर रुग्णालय :
 जखमी २६, मृत : ४
सिव्हिल रुग्णालय :
जखमी ८, मृत १
शीव रुग्णालय : जखमी एक